गडचिरोली ,दि. 6 :– सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर उपपोलिस ठाण्यांतर्गत कल्लेड येथील जंगलात आज ६ डिसेंबर रोजी सकाळी झालेल्या चकमकीत पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी ७ जहाल नक्षलवादी कंठस्रान घातले. यात ५ महिला, तर २ पुरुष नक्षल्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नक्षल विरोधी अभियानचे प्रमुख तथा विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार यांनी दिली.
पत्रकार परिषदेस गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी. आर. सामी उपस्थित होते. शरद शेलार यांनी सांगितले की, कल्लेडच्या जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन जवानांनी तेथे अभियान राबविले. यावेळी २० ते २५ च्या संख्येत असलेल्या नक्षल्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी पळून गेले. मात्र, घटनास्थळावर ५ महिला व २ पुरुष नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. ७ पैकी ६ नक्षल्यांची ओळख पटल्याची माहितीही श्री.शेलार यांनी दिली.
पोलिसांनी घटनास्थळावरुन २ एसएलआर, २ आठ एमएम रायफली, २ बारा बोअर रायफली, १ बारा बोअर कट्टा यासह माओवादी पत्रके व साहित्य जप्त केले आहे. पीएलजीए सप्ताहादरम्यान प्रथमच माओवाद्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यापूर्वी २०१३ मध्ये गोविंदगाव चकमकीमध्ये नक्षल्याचे मृतदेह सी-६० पथकाला मिळाले होते. त्यानंतर आज कल्लेडच्या चकमकीत पोलिसांना मिळालेले हे सर्वांत मोठे यश आहे. आपले अस्तित्व दाखविण्यासाठी नक्षलवादी सामान्य आदिवासी व दलित नागरिकांना पोलिस खबऱ्या घोषित करुन त्यांची क्रूरपणे हत्या करतात. त्याला गडचिरोली पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिल्याचे शरद शेलार म्हणाले.