Home Top News २०१९ पर्यंत २५ हजार गावे दुष्काळमुक्त!-डवले

२०१९ पर्यंत २५ हजार गावे दुष्काळमुक्त!-डवले

0

मुंबई,दि.21ः राज्यातील सर्व गावांना पाण्याबाबत स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकार जलयुक्त शिवार हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. २०१९ पर्यंत २५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. जलयुक्त शिवार मोहिमेंतर्गत आतापर्यंत ११ हजार गावांचा समावेश करण्यात आला आहे. यावर्षी मेपर्यंत आणखी पाच हजार गावांचा समावेश करण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या मृदा व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी मंगळवारी दिली. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेत ‘जल संवर्धन’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.

‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्य सरकार मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली २०१४ पासून जलयुक्त शिवार ही योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत पूर्वीचे जल संवर्धनाचे व वाढीचे सर्व प्रकल्प एकत्र आणण्यात आले. त्याअंतर्गत २०१९ पर्यंत २५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याअंतर्गत गावांची निवड करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करण्यात येत असल्याचे डवले यांनी सांगितले.ते म्हणाले, ‘राज्यातील पाण्याच्या वापराचा अभ्यास केल्यास ८० टक्के पाण्याचा शेतीसाठी, १५ टक्के पाण्याचा उद्योगांसाठी व पाच टक्के पाण्याचा वापर पिण्यासाठी होतो. या पाण्याच्या वापराच्या पद्धतीनुसार अधिकाधिक गावांना पाण्याच्या बाबतीत कसे स्वयंपूर्ण करता येईल त्याबाबत विचार करण्यात आला आहे.’

Exit mobile version