
रायपूर,दि.6(वृत्तसंस्था)-छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी कारवाईमध्ये सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे.सुकमा जिल्ह्यात जवानांनी 14 नक्षलींचा खात्मा केला आहे. सुकमामध्ये रविवारपासून (5 ऑगस्ट) जवानांकडून शोधमोहीम राबवण्यात येत आहे. यामोहीमेदरम्यान 14 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. सुकमा येथील कोंटा आणि गोलापल्ली पोलीस स्टेशन हद्दीत जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यावेळी कारवाईदरम्यान, सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. जवळपास 200 नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळताच जवानांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीमेवेळी नक्षलवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात ठार झालेल्या 14 नक्षलींचे मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत. शिवाय, घटनास्थळावरुन 16 शस्त्रंदेखील जप्त करण्यात आली आहेत.