Home Top News महाराष्ट्रात डिझेल 4 रुपये 6 पैशांनी स्वस्त

महाराष्ट्रात डिझेल 4 रुपये 6 पैशांनी स्वस्त

0

मुंबई, दि. 5: केंद्रापाठोपाठ राज्यात पेट्रोलच्या दरांमध्ये अडीच रुपयांची कपात करण्याचा निर्णय काल (दि.4) घेतल्यानंतर आता डिझेलच्या दरांमध्येही लिटरमागे 56 पैशांच्या कर सवलतीसह एकूण 1 रुपये 56 पैशांनी कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. यामुळे राज्यात आता डिझेल 4 रुपये 6 पैशांनी स्वस्त होणार असून राज्यातील जनतेला आणखी दिलासा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम म्हणून इंधनाच्या दरांमध्ये देशातही सातत्याने वाढ होत होती. या दरवाढीपासून जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये लिटरमागे प्रत्येकी अडीच रुपयांची कपात केल्याची घोषणा काल (दि.4) केली. त्याला तातडीने प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात पेट्रोलवरील मूल्यवर्धित करामध्ये अडीच रुपयांची घट करण्याची घोषणा केली. यामुळे राज्यात लिटरमागे पेट्रोल एकूण 5 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
पेट्रोलपाठोपाठ डिझेलही स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार, डिझेलच्या दरात लिटरमागे 56 पैसे करसवलतीसह एकूण 1 रुपये 56 पैशांची कपात करण्यात आली आहे. यामुळे केंद्राचे अडीच रुपये व राज्याचे 1 रुपये 56 पैसे असे मिळून लिटरमागे 4 रुपये 6 पैशांची कपात झाल्याने डिझेल स्वस्त होणार आहे.

Exit mobile version