Home Top News दारूच्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला चिरडले

दारूच्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला चिरडले

0

शासनाने नागभिडचे पोलिस उपनिरीक्षक चिडे यांचे कुटूंबियांच्या पाठीशी रहावे – श्रमिक एल्गार “

चंद्रपूर,दि.06: दारूबंदी घोषित केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या पोलीस निरीक्षक छत्रपती किसनराव चिडे यांना त्याच वाहनाने चिरडून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली.मौशी रस्त्याने पवनी – तोरगाव मार्गे दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती ठाणा प्रभारी चिडे यांना मिळताच ते पी एस आय ए.एस. मलकापूरे , संदीप कोवे आणि पितांबर खरकाटे, रामकृष्ण बोधे यांना सोबत घेऊन मौशीकडे निघाले.
दारूची अवैध वाहतूक करणारी गाडी दृष्टीपथात येताच त्यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. यादरम्यान मौशीजवळील गोसे खूर्द नहराजवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला या गाडीने धडक दिली व दारूची वाहतूक करणारी गाडी थांबली. त्यामुळे पोलिस गाडीतून पाठलाग करणारे पोलिस गाडीतून खाली उतरले व दारूची वाहतूक करणाऱ्या गाडीकडे पायी चालू लागले . तेवढयात दारूची वाहतूक करणारी गाडी रिव्हर्स घेवून पोलिसांच्या अंगावर घालण्यात आली. अचानक झालेल्या या प्रकाराने पोलिस भांबावले. मात्र तिघे चपळाईने बाजूला झाले. पण प्रभारी ठाणेदार छत्रपती चिडे यांचे अंगावरून गाडी गेल्याने ते जागीच ठार झाले.
नागभीड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांचेवर अवैध दारू विक्रेत्यांनी गाडी चढवून, त्यांना ठार केले, ही घटना अतिशय गंभीर असून, श्रमिक एल्गार या घटनेचा निषेध करते.  अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी व शासनाने चिडे यांचे कुटूंबियाचे पाठीशी राहण्यांची मागणी करीत आहे.चंद्रपूर जिल्हयात दारूबंदी लागू करतांना, राज्यशासनाने, अमंलबजावणीची यंत्रणा देण्याचे मान्य केले होते.  मात्र दारूबंदी केल्यानंतर, शासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यांने, अवैध दारू विक्रेत्यांचे मनोबल वाढले आहे.  चिडे यांना ठार मारले ही अतिशय चिड आणणारी घटना आहे.  यापूर्वीही अवैध दारू विक्रेत्यांनी पोलिसांवर व दारूबंदी करणाऱ्रया कार्यकर्त्यावर असे जिवघेणे हल्ले केले असल्यांने, शासनाने अवैध दारू विक्रेत्यांचे विरोधात ठोस भूमिका घेणे आवश्‍यक आहे.

मागील चार वर्षापासून, शासनाने चंद्रपूर जिल्हा दारूबंदीच्या अमंलबजावणीसाठी एकही आढावा बैठक घेतली नाही.  या जिल्हयात अवैध दारू पुरवठा करणारे इतर जिल्हयातील दारू दुकानाचे परवाने रद करण्यांची घोषणा केल होती, मात्र एकही दुकानावर कारवाई झाली नाही.  दारूबंदीच्या जिल्हयातील दारूबंदीचे कायदे कडक करण्याबाबत चार बैठका होवूनही त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.  मुंबई दारूबंदी कायदयातील कलम 7 प्रमाणे समिती नेमण्याचे मान्य करूनही अशा समित्या नेमल्या नाहीत.  व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यांचे जाहीर केले मात्र जिल्हयात एकही नविन व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात आले नाही. चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या तीन जिल्हयाचे “ड्राय झोन” तयार करून, अतिरिक्त पोलिस दल देण्यांची घोषणाही अजूनपर्यत अमंलात आलेली नाही.  अवैध दारू विक्रेत्यांवर जरब बसेल असा कोणताही निर्रणय शासनाने न घेतल्यांने, अवैध दारू विक्रेत्यांची हिमंत वाढली असून, ते थेट आता पोलिसांचा जीव घेत असल्यांने, हे प्रकरण शासनाने गांभीर्याने घेवून दारूबंदीच्या अमंलबजावणीसाठी दिलेले आवश्वासन पूर्ण करावे व मृतक चिडे यांचे कुटूंबियाना भरघोस भरपायी ध्यावी अशी मागणी श्र‍मिक एल्गारच्या अध्यक्षा ॲङ पारोमिता गोस्वामी यांनी केली आहे.

Exit mobile version