Home Top News पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन इसमाची हत्या

पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन इसमाची हत्या

0
file photo

गडचिरोली,दि.05 : कुरखेडा तालुक्यातील वाहन जाळपोळ तसेच भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाल्याच्या घटनेची शाई वाळते न वाळते नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यात पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून एका इसमाची हत्या केल्याची घटना आज रविवारी पहाटेच्या सुमारास भामरागड तालुक्याच्या मर्दहूर येथे उघडकीस आली. डुंगा कोमटी वेडद (३५) रा. नैनवाडी असे नक्षल्यांनी ठार केलेल्या इसमाचे नाव आहे. नैनवाडी गावापासून तीन किमी अंतरावर असलेल्या मर्दहूर गावात शनिवारी रात्रीच्या सुमारास लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्न समारंभासाठी डुंगा वेडद हा आपल्या गावातील काही नागरिकांसोबत मर्दहूर गावात आला होता. लग्न समारंभाच्या ठिकाणी असतानाच रात्रीच्या सुमारात नक्षलवादी  तेथे आले. डुंगा वेडद याला गावाबाहेर नेऊन त्याची हत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा आप्त परिवार आहे. नक्षलवाद्यांच्या या हिंसक कारवाईमुळे भामरागड तालुक्यात नक्षल्यांची दहशत निर्माण झाली आहे. नक्षलवाद्यांनी पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून वेडद याची हत्या केल्याचे बोलल्या जात आहे. नारगुंडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दित नैनवाडी हे गाव आहे. भामरागड तालुका मुख्यालयापासून मर्दहूर हे गाव ३० ते ३२ किमी अंतरावर आहे. भामरागड येथून सदर गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. घनदाट जंगलातून बैलबंडीचा रस्ता जातो.  त्यामुळे मृतक वेडद याचा मृतदेह वृत्त लिहिस्तोवर भामरागड येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला नव्हता. रविवारी पहाटेची घटना असली तरी या घटनेची तक्रार देण्यासाठी दुपारी १ वाजेपर्यंत नारगुंडा पोलीस मदत केंद्रात कोणीही पोहोचले नव्हते.

Exit mobile version