वृत्तसंस्था/नवी दिल्ली,दि.05 – निर्भयाच्या चारही दोषींच्या विरोधात अखेर दिल्लीच्या कोर्टाने शेवटचे डेथ वॉरंट गुरुवारी जारी केले आहे. त्यानुसार, सर्वांना 20 मार्च रोजी पहाटे ठीक 5:30 वाजता फासावर लटकवले जाणार आहे. कोर्टाने आतापर्यंत जारी केलेला हा चौथा वॉरंट असून तोच अंतिम राहील असे मानले जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी दोषी पवन गुप्ताची दया याचिका फेटाळली. त्यानंतर दिल्ली सरकार नवे डेथ वॉरंट जारी करण्यासाठी पतियाळा हाऊस पोहोचले होते. याच कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी चारही दोषींना नोटिस जारी करून गुरुवारपर्यंत उत्तर मागितले होते.
यापूर्वी तीनदा रद्द झाले डेथ वॉरंट…
1. 22 जानेवारीला सकाळी 6 वाजता फाशी होणार होती, पण टाळली गेली.
2. 1 फेब्रुवारीला फाशी देण्याचे डेथ वॉरंट जारी केले गेले, पण फाशी झाली नाही.
3. 3 मार्चला सकाळी 6 वाजता फाशी दिली जाणार होती, पण आरोपी पवनकडे कायदेशीर पर्याय बाकी असल्यामुळे फाशी टाळली गेली.
16 डिसेंबर 2012 : 6 आरोपींनी निर्भयासोबत केले होते दुष्कृत्य…
दिल्लीमध्ये पॅरामेडिकल विद्यार्थिनीसोबत 16 डिसेंबर 2012 च्या रात्री 6 लोकांनी चालत्या बसमध्ये दुष्कृत्य केले होते. गंभीर जखमांमुळे 26 डिसेंबरला सिंगापुरमध्ये उपचारादरम्यान निर्भयाचा मृत्यू झाला होता. घटनेच्या 9 महिन्यानंतर म्हणजेच 2013 मध्ये लोअर कोर्टाने 5 आरोपी… राम सिंह, पवन, अक्षय, विनय आणि मुकेश यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. मार्च 2014 मध्ये हायकोर्ट आणि मे 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. ट्रायलदरम्यान मुख्य दोषी राम सिंहने तिहार जेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आणखी एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे 3 वर्षात सुधारणा गृहात राहून मुक्त झाला आहे.