
नागपूर,दि.14-ः भारतात कोरोना आजार पाय पसरत आहे. नागपुरातही कोरोनाचे तीन रुग्ण आहेत. बुधवारी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. शुक्रवारी पुन्हा दोन रुग्णांची नोंद झाली असून, आता नागपुरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन झाली आहे. शुक्रवारी दोन रुग्णांच्या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
कोरोना विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण नागपुरात बुधवारी आढळून आला होता. खबरदारी म्हणून या रुग्णाच्या संपर्कात आलेले त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र व त्यांची तपासणी करणारे दोन डॉक्टरांसह त्यांच्याकडे काम करणार्या अशा १७ संबंधितांना तपासणीसाठी गुरुवारी मेयो, मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. गुरुवारी रात्री उशिरा यातील १५ संबंधितांच्या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला. यात सर्व जण निगेटिव्ह आले. परंतु त्यांच्या ४२ वर्षीय पत्नी आणि ५0 वर्षीय निकटवर्तीय पॉझिटिव्ह आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.
नागपूर विभागात कोरोना विषाणूसंदर्भात प्रतिबंधक उपाय सुरू असल्यामुळे तसेच या विषाणूसंदर्भात जनतेमध्ये जागृती करण्यात येत आहे. जनतेनेही कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता स्वच्छता ठेवून काळजी घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त यांनी केले आहे. कोरोना विषाणूसंदर्भातील आतापर्यंत ८0 संशयितांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी ३१ रुग्ण दाखल करण्यात आले असून, त्यापैकी आतापर्य्ंत तीन रुग्णांची तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. ३९ नमुने तपासण्यात आले आहेत. तसेच ३१ संशयितांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. सध्या ४९ रुग्णांचा पाठपुरावा सुरू आहे.
विमानतळावर प्रवाशांची तपासणी
आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत असून, आजपर्यंत ७७१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली असता कुणालाही लक्षणे आढळून आलेली नाहीत. विभागात प्रतिबंधक उपायांची विविध माध्यमाद्वारे नागरिकांना माहिती देण्यासाठी विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका तसेच आरोग्य विभागातर्फे केंद्र व राज्य शासनाच्या कोरोना विषाणूसंदर्भात राबवायच्या उपाययोजनाबाबत दिलेल्या निर्देशानुसार संयुक्तपणे प्रभावी व परिणामकारक कार्यवाही सुरू आहे.
संशयित रुग्णांची संख्या वाढली
कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीची पत्नी व मामेभाऊ शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली. नागपुरात कोरोनाचे आता तीन रुग्ण झाले आहेत. राज्यात पुण्यानंतर सर्वाधिक रुग्णाची नोंद मुंबई व नागपुरात झाली आहे. एकीकडे पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत असताना संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे. सायंकाळपयर्ंत मेयो व मेडिकलमध्ये सहा संशयित रुग्ण दाखल झाल्याने चिंतेचे वातावरण आहे. अमेरिकेहून आलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीला बुधवारी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल करण्यात आले. या रुग्णाचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्याशी संपर्कात आलेल्या संबंधितांचे नमुने तपासण्यात आले. यात त्यांचे सासरे, दोन्ही मुले, तपासणी करणारे दोन्ही डॉक्टर, कर्मचारी व मित्र अशा संबंधितांच्या नमुन्यांचा अहवाल गुरुवारी रात्री उशिरा निगेटिव्ह आला. परंतु त्यांच्या पत्नी व मामेभाऊ यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अंतिम अहवाल देण्यापूर्वी शुक्रवारी या दोघांचे नमुने पुन्हा तपासण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र पातूरकर यांनी या दोघांना कोरोना असल्याचे जाहीर केले. ४५ वर्षीय पॉझिटिव्ह व्यक्तीवर मेयोच्या वॉर्ड क्र. २४ मध्ये तर त्यांच्या पत्नी व मामेभावावर मेडिकलच्या २५ मध्ये उपचार सुरू आहेत.
आमदार निवासात विलगीकरण कक्ष
नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि र्जमनी या सात देशातून प्रवास केलेल्या नागरिकांना केंद्र शासनाच्या सूचनेनुसार विलगीकरण कक्ष तयार करण्यात येत आहे. यासाठी सिव्हिल लाईन्स परिसरातील आमदार निवास येथील मध्यवर्ती इमारतीचा वापर करण्यात येत आहे. वर नमूद सात देशांमधून येणार्या नागरिकांना यापुढे थेट विमानतळावरून तेथे घेऊन जात, १४ दिवस त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सांगितले.