
नागपूर,(विशेष प्रतिनिधी).14 – नागपुरमध्ये 5 कोरोना संशयित रुग्णालयातून बेपत्ता झाले आहेत. हे पाचही जण नागपूरात पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यांना शासकीय मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज यांचा चाचणी अहवाल आज येणार होता. तत्पूर्वीच हे पाचही जण काल मध्यरात्री रुग्णलायतून बेपत्ता झाले. रुग्णालय प्रशासनाने याबाबत पोलिसांना माहिती दिली.
चार पैकी तीन रुग्ण परत आले
मेयोमधून निघून गेलेल्या त्या कोरोना संशयित चार रुग्णांशी रुग्णालय प्रशासनाने संपर्क साधला असून त्यापैकी तीन रुग्णांशी रुग्णालयात परत आले आहेत. एक रुग्ण सायंकाळपर्यंत परत येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी त्यांच्यासोबत मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया उपस्थित होते. जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले की, त्या चार कोरोना संशयित पैकी तिघांना कुठलेही लक्षणे नाहीत. त्यांचे रिपोर्ट यायला खूप उशिर झाला होता. तसेच त्या रुग्णांच्या कुटुंबियांच्या काही व्यक्तिगत कामे होती. दरम्यान त्यांच्याशिवाय इतर काही रुग्णांचे रिपोर्ट आले, ते निगेटिव्ह आल्याने ते घरी जायला निघाले. त्यांच्यासोबतच हे चार जणही निघून गेले.रुग्णालय प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क साधला असून त्यांना परत बोलावले आहे. त्यापैकी तिघे जण रुग्णालयात पोहोचलेही. तर एक जण सायंकाळपर्यंत येणार आहे. या चौघांचे रिपोर्ट सायंकाळपर्यंत येतील.
कोरोनाग्रस्त आणि संशयितांवर असेल पोलिसांचा पहारा…
नागपुरातील कोरोना संशयितांवर आता पहारा ठेवण्यात येणार आहे. नागपुरातील शासकीय रुग्णालयात ज्या ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण आणि संशयितांना ठेवण्यात येते, त्या वॉर्डाबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात येईल अशी माहिती नागपूर जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली आहे.