बुलडाणा(विशेष प्रतिनिधी)दि.14- सौदी अरेबिया येथील हज येथुन जिल्हयात परतलेल्या एका वृध्द संशयित कोराना रुग्णाचा उपचारादरम्यान येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मुत्यू झाल्याची घटना आज 14 मार्च रोजी घडली. या रुग्णाला सर्दी व तापाची लक्षणे असल्याने सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. या घटनेची माहिती सोशल मिडिया मधुन व्हायरल होताच नागरीकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान हा रुग्ण कोरोना विषाणुचा होता की नाही. या बाबत तपासणीकरता पाठविण्याात आालेल्या नमुन्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळणार असल्याची भुमिका जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी व्यक्त केली आहे.करण्यात आली आहे. तर नागरीकांनी सतर्कता व स्वच्छता बाळगावी, असे आवाहनही आरोग्य प्रशासनाने केले आहे.
जिल्हयातील एक नागरिक सौदी अरेबीयामध्ये गेला होता. त्याच ठिकाणी त्याला सर्दी, ताप व खोकला आला होता. दरम्यान आजारावर कोठलेही उपचार न केल्याने त्याची प्रकुती खालावली होती. अशाच आजारी अवस्थेत त्याला भारतात आणण्यात आले. सर्वप्रथम त्याची मुंबई विमान तळावर तपासणी करण्यात आली. परंतु प्रकुती ठिक असल्याचे सागून त्याला त्याच्या मुळ गावी जाण्याची परवानगी देण्यात आली. काही दिवसापुर्वीच तो गावाकडे परतला होता. विशेष म्हणजे त्याला मधुमेह व रक्त दाबाचा आजार सुध्दा होता. दरम्यान आज प्रकुती चिंताजनक झाल्याने त्याला प्रथम शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचारार्थ भरती करण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी नातेवाईकास येथील सामान्य रुग्णालयात रुग्णास हलविण्याचा सल्ला दिला. यावेळी रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णास तातडीने विलगीकरण कक्षात उपचारार्थ भरती केले. परंतु उपचार सुरू असतांनाच त्याचा आज दुपारी चार वाजुन वीस मिनिटांनी मुत्यू झाला. या संशयीत कोरोनाग्रस्त रुग्णाचे रक्ताचे नमुने नागपुर येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच तो रुग्ण कोरोनाग्रस्त होता की नाही, हे स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे रुग्णासोबत असलेल्या नातेवाईकांना खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या घटनेची माहिती वार्यासारखी शहरात पसरताच नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
नागरीकांनी घाबरून जावू नये
या रुग्णाला मधुमेह, श्वसनविकार व रक्त दाबाचा आजार असल्याचेही समोर आले आहे. या आजारामुळेच त्याला रुग्णालयात उपचारार्थ आणले होते. त्याचा मुत्यू झाल्यानंतर कुटुंबालाही निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. अशी माहिती देत कोरोना आजाराचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य प्रशासन सज्ज आहे. तरी सुध्दा नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. स्वच्छ हात धूऊन नाकाला मास्क सारखा रुमाल बांधावा. श्वसनाचा आजार असल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी केले आहे.
सर्व शाळा-कॉलेज बंद, परीक्षा सुरूच राहणार
महाराष्ट्र सरकारने सध्या सरकारी आणि खासगी शाळा-कॉलेज 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 10वी, 12वी आणि यूनिव्हर्सिटीच्या परीक्षा आपल्या वेळेत होणार आहेत.