
संभाजीनगर-छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधीवाटपावरून आज शिंदे गट व ठाकरे गटात चांगलाच राडा झाला. ठाकरे गटाच्या आमदाराला निधी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या अंबादास दानवे आणि मंत्री संदिपान भुमरे व अब्दुल सत्तार हे हमरीतुमरीवर आल्याचे पाहायला मिळाले.
दोन नाही दोनशे गद्दार असते तरी बाळासाहेबांचा एकटा शिवसैनिक @iambadasdanve पुरून उरला असता..
अभिमान आहे सर तुमचा..!!
pic.twitter.com/BZKlvywTt3— शिवसैनिक शैलेश वर्मा (@Shailesh_Varmaa) August 7, 2023
आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावरुन मंत्री संदीपान भुमरे यांनी आणि अब्दुल सत्तार यांनी आमदार राजपूत यांचा एकेरी उल्लेख केल्याने शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार राजपूत यांच्या मदतीला धावून आले आणि मंत्री भुमरे आणि सत्तार यांना सुनावले. यावरुन थेट हमरीतुमरी सुरु झाली आणि हा वाद थेट एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यंत पोहोचला असल्याचे समोर आले.
जिल्हा नियोजन समिती अंतर्गत कशाप्रकारे निधी वाटप करण्यात आलेला आहे याची तालुका निहाय माहिती देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बैठकीत केली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान हा वाद झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी यावर उत्तर देण्याऐवजी वाद घालण्यास सुरुवात केली. यावरून या दोघांमध्ये चांगलीच खंडाजंगी झालेली दिसली.
यावेळी मी या सगळ्यांसोबत शिंदे गटात गेलो नाही म्हणून माझ्यावर सूड उगवत असल्याचा आरोप आमदार उदयसिंह राजपूत यांनी केला. मी शिंदे गटात गेलो नाही. त्यामुळेच मला निधी देत नाही, असा सनसनाटी आरोप आमदार उदयसिंह राजपूत यांनी बैठकीत केला. आता आम्ही हा अन्याय सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तर, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. शांत बसणार नाही, असे अंबादास दानवे यांनी सुनावले. मी संदिपान भुमरे यांच्यासोबत आधी काम केले आहे म्हणून शांत बसलो होतो. मात्र दुसरे कोणी असते तर शिवसैनिक काय असते हे तुम्हाला दिसले असते, असा सूचक इशाराच आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी शिंदे गटांच्या नेत्यांना दिला.
तर, पालकमंत्री संदीपान भुमरे आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी मात्र सारवासारव करत सौम्य भूमिका घेतली. कुठलाही वाद नाही. आम्ही सगळ्यांना समान निधी देतोय. ते विरोधी पक्ष नेते आहेत. ते थोडा गोंधळ करणारच. ही त्यांची पद्धत आहे. आमच्यात वाद नाही, असे सांगत आम्ही निधी देऊन त्यांचे समाधान केला आहे ,अशा पद्धतीची सारवासारव पालकमंत्री संदिपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांनी केली..