गोंदिया, दि.9 : खरीप हंगामपूर्व जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा विक्रेते व कृषि निविष्ठा उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी यांची कार्यशाळा 7 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीचे सभागृहात पार पडली. कार्यशाळचे अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषि आयुक्तालयाचे कृषि अधिकारी शाहुराव मोरे उपस्थित होते.
यावेळी शाहुराव मोरे यांनी खरीप हंगामातील खताचे संतुलीत वापर, माती परिक्षणाचे महत्व, धान बियाणेवरील बीज प्रक्रिया, किडरोग व्यवस्थापन व गुणवत्तेच्या निकषावर बियाण्यांची निवड या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच अनाधिकृत व बनावट खत विक्री टाळावी, खतासोबतची लिंकींग न करण्याबाबत व शेतकऱ्यांना प्रमाणित असलेले कृषि निविष्ठा पुरविण्याबाबत सूचना दिल्या.
महाबीजचे प्रतिनिधी सुभाष मेश्राम यांनी साथी पोर्टल विषयी सखोल माहिती दिली. या पोर्टलच्या माध्यमातून बियाणे वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक कशी होईल याबद्दल मार्गदर्शन केले. सेवासंस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी सारस पक्षी संवर्धन व संरक्षण याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे यांनी अनुदानीत खतासोबत इतर दुय्यम खते लिंकींग न करण्याबाबत उपस्थित सर्व खत उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींना सक्त सूचना दिल्या. तसेच पॉस मशिन साठा व प्रत्यक्ष साठा यांचे ताळमेळ ठेवणे, विहित नमुन्यात दस्ताऐवज जतन करुन शेतकऱ्यांना देयके देणे व वाजवी दरात कृषि निविष्ठांची विक्री करण्याबाबत सर्व कृषि निविष्ठा विक्रेत्यांना सूचना दिल्या.
यावेळी आरसीएफ कंपनीद्वारे प्रातिनिधिक स्वरुपात ई-पॉस मशिनचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक वाय.बी.बावनकर व मोहिम अधिकारी पी.डी.कुर्वे यांनी सदर कार्यशाळेचे यशस्वीपणे आयोजन केले.