कोरोनाबाबत सकारात्मक दृष्टीकोनातून काम करावे-जिल्हाधिकारी मीना

0
330

गोंदिया दि.22 – जिल्ह्यात सातत्त्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दररोज वाढणारी बाधितांची संख्या ही जिल्ह्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढण्यासाठी यंत्रणांनी कोरोना बाधित रुग्णांबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिले.

आज 22 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात कोविड-19 संदर्भात तिरोडा तालुक्याचा आढावा घेतांना आयोजित सभेत श्री. मीना बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, तिरोडा नगरपरिषद मुख्याधिकारी श्रीमती अर्चना मेन्ढे, तहसिलदार प्रशांत घोरुडे, तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.हिम्मत मेश्राम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश मोटघरे, गटविकास अधिकारी एस.एम.लिल्हारे, गटशिक्षणाधिकारी एम.डी.पारधी, विस्तार अधिकारी पी.डी.कुर्वे व जी.एम.भायदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री मीना पुढे म्हणाले, कोरोना केअर सेंटरमध्ये प्राथमिक तपासणी झाली पाहिजे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर त्यांना कोरोना केअर सेंटरमध्ये आणले पाहिजे. होम आयसोलेशमध्ये कोणत्याही बाधित रुग्णाचा मृत्यू होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. कोविडबाबत काही अडचणी आल्यास पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी. होम क्वारंटाईनसाठी तहसिलदाराची मंजूरी घेणे आवश्यक आहे. बाधित रुग्णांच्या एक्सरे बाबत तसेच कंटेंटमेन्ट झोनची व्यवस्था कशाप्रकारे करण्यात येते याबाबत त्यांनी यंत्रणेला विचारणा केली. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या बाधित रुग्णांकडे तहसिलदारांनी विशेष लक्ष्य दयावे. तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात रिक्त पदे भरलेली नसल्यामुळे मनुष्यबळाची अडचण येत आहे. त्यामुळे रिक्त पदे भरण्याची लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही राज्य शासनाची महत्वाकांक्षी मोहिम आहे. या मोहिमेची नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. या मोहिमेअंतर्गत तिरोडा तालुक्यातील संपूर्ण कुटुंबाचे सर्व्हे करुन डाटा एन्ट्रीचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे. यामध्ये एका दिवसात 50 कुटुंबाचे सर्व्हे करायचे आहे. संपूर्ण कुटुंबाचे सर्व्हे करण्याकरीता ग्रामस्तरावर ग्रामपंचायतीमध्ये पल्स ऑक्सीमीटर, थर्मल गन, मास्क, सॅनिटायजर व हॅन्‍ड ग्लोव्हचा पुरवठा करण्यात यावा. साहित्य पुरवठा करण्याकरीता नगरपरिषदेची मदत घेण्यात यावी असेही श्री.मीना यावेळी म्हणाले.

तिरोडा तालुक्यात सरांडी येथे कोरोना केअर सेंटर आहे. या केंद्रामध्ये बाधित रुग्णांसाठी 112 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे व आय.टी.आय. तिरोडा येथे 103 बेडची व्यवस्‍था करण्यात आली आहे. व्हेन्टीलेटरसाठी तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. दररोज 70 ते 80 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात येते अशी माहिती यावेळी संबधित अधिकाऱ्याने दिली.