रूग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेबाबत हेल्पलाईन – जिल्हाधिकारी शैलेश नवाल

0
67
????????????????????????????????????

अमरावती, दि. 23  :  कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी शासकीय, खासगी रूग्णालयातील खाटांची उपलब्धता व तद्नुसार इतर माहितीसाठी  हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार गरजूंना रूग्णालयात उपलब्ध खाटांची माहिती मिळू शकेल.

दरम्यान, जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम सर्वदूर राबविण्यात येत असून, जिल्ह्यात अद्यापपर्यंत दोन लाखांहून अधिक कुटुंबांना भेटी देण्यात आल्या आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांत दक्षतेच्या त्रिसूत्रीचा अवलंब हे अत्यंत महत्वाचे साधन आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून दक्षता पाळून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.

हेल्पलाईन सुविधा

शासकीय, तसेच सर्व खासगी रूग्णालयांमध्ये उपलब्ध खाटांच्या उपलब्धतेबाबत नागरिकांना अद्ययावत माहिती मिळावी यासाठी ही हेल्पलाईन जिल्हा सामान्य रूग्णालयात कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, जिल्हाधिकारी कार्यालय स्थित संवाद कक्षाचा संपर्क क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोविड हेल्पलाईनचा क्रमांक 8856922546, तसेच 8855052546 असा आहे. संवाद कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 18002336396 असा आहे.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी

जिल्ह्यात विविध विभागांच्या समन्वयाने  ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत आठवडाभरात दोन लाखांहून अधिक कुटुंबांना भेट देऊन तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली.

मोहिम कालावधीत आरोग्‍यपथकाव्‍दारे प्रत्‍येक कुटुंबातील नागरिकांची भेट घेऊन त्‍यांच्‍या आरोग्‍याबाबतची माहिती, जोखीम गटातील नागरिकांची माहिती, शरीराचे तापमान तपासणी, रुग्‍ण आढळून आल्‍यास जवळच्‍या ताप उपचार केंद्रामध्‍ये संदर्भित करणे, सार्वजनिक ठिकाणी मास्‍कचा वापर करणे, सतत हात धुणे, सोशल डिस्‍टन्‍सिंग पाळणे इत्‍यादी बाबतची जनजागृती आणि प्रबोधन करण्‍यात येत आहे.  या मोहिमेत नागरिकांनी स्‍वयंस्‍फूर्तीने  तपासणी करुन घेणे, आजाराची माहीती आरोग्‍य पथकाला सांगणे आवश्यक आहे. नागरिकांनी दक्षता पाळून व परिपूर्ण माहिती देऊन मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. रणमले यांनी केले.