भंडारा दि.24 : कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गृहभेटीव्दारे प्रत्येक कुटुंबाच्या सर्व्हेक्षणाचे काम जिल्हयात सुरू झाले असून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेत जिल्हयातील 2 लाख 85 हजार 414 कुटुंबाचे सर्व्हेक्षण व आरोग्य तपासणी केली जाणार आहे. दोन टप्यात राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत शहर व ग्रामीण भागात 861 पथकाव्दारे सर्व्हेक्षण करण्यास सुरूवात झाली आहे.
मोहिमेमध्ये आरोग्य पथकाव्दारे गृहभेटीत संशयीत कोविड-19 रूग्णांची तपासणी, अतिजोखमीचे व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोविड-19 प्रतिबंधसाठी आरोग्य शिक्षण, सारी व आयएल आय रूग्णांचे गृहभेटीव्दारे सर्व्हेक्षण तसेच कोविड-19 ची तपासणी व उपचार आणि प्रत्येक नागरिकांचे आरोग्य शिक्षण यावर भर देण्यात येत आहे. पथकातील सदस्यांनी गृहभेटीव्दारे हे कार्य सुरू केले आहे.
भंडारा जिल्हयाची लोकसंख्या ग्रामीण 10 लाख 52 हजार 884 व शहरी 1 लाख 65 हजार 327 अशी एकूण 12 लाख 18 हजार 211 एवढी आहे. तर जिल्हयात एकूण 2 लाख 85 हजार 414 घरं आहेत. यासाठी 861 पथक तयार करण्यात आली आहेत. या पथकांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आरोग्य पथकाव्दारे दररोज पहिल्या फेरित 50 घरांना भेट देण्यात येईल आणि दुसऱ्या फेरित 75 घरांना भेटी देण्यात येतीत. भेटी दरम्यान ताप (100.4 फॅ. किंवा जास्त) एसपीओटू (95 टक्के पेक्षा कमी). खोकला आणि इतर लक्षण असणारे रूग्ण आढळल्यास त्यांना पथक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे संदर्भित करेल. वैद्यकीय अधिकारी तपासून आवश्यकते नुसार तेथेच उपचार करतील किंवा फिवर क्लिनिक अथवा कोविड-19 रूग्णालयास संदर्भित करतील आरोग्य पथक घरातील सर्व सदस्यांना त्यांच्या कोविड स्थितीनुसार आरोग्य शिक्षण देणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य पथकांना सहकार्य करावे. ही मोहिम आरोग्याच्यादृष्टिने अतिशय उपयुक्त अशीच आहे.
भंडारा जिल्हयातील ग्रामीण व शहरी नियोजन
अ.क्र | तालुका | लोकसंख्या | एकुन घरे | एकुण पथक |
1 | भंडारा | 195239 | 48313 | 189 |
2 | मोहाडी | 149564 | 33504 | 52 |
3 | तुमसर | 179059 | 40857 | 129 |
4 | साकोली | 144412 | 32848 | 112 |
5 | लाखणी | 128134 | 31522 | 124 |
6 | पवनी | 127949 | 31766 | 77 |
7 | लाखांदूर | 128527 | 30174 | 107 |
8 | नगर परिषद क्षेत्र | 165327 | 36430 | 71 |
जिल्हा एकुन | 1218211 | 285414 | 861 |
या मोहिमेत भाग घोणाऱ्या नागरिकांसाठी वैयक्तिक व संस्थात्मक बक्षिस देण्यात येणार आहेत. विद्यार्थी, पालक, सामान्य व्यक्ती यांचेसाठी अनेक वैयक्तिक तर शहरे, ग्रामपंचायत, नगरपालीका यांना संस्थात्मक बाक्षिस देण्यात येणार आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम कोविडमुक्त महाराष्ट्रासोबतच सुदृढ आरोग्यासाठी महत्वाची असून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.