प्रशासनाने सोडले आरोग्य विभागाला वार्यावर-शैलेष बैस

मुख्य लेखाधिकार्यानी रोखल्या पदोन्नत्या व विभाग बदल्या

0
791

गोंदिया,दि.24ः- कोरोना महामारीच्या संकटामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागावर मोठे ताण आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील लेखा विभागात कर्मचारी नसल्यामुळे एप्रिल महिन्यात जाणारे चार माही अंदाजपत्रक हे सप्टेंबर महिन्यापर्यंत जाऊ शकले नाही. त्यामुळे येणार्‍या काळात कर्मचार्‍यांच्या वेतनावर मोठा परिणाम होणार आहे. तसेच इतर कामावर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे. कर्मचारी नसल्यामुळे २0 जुलैपासून आपणास तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य विभागाची लेखा विभागाची सूत्रे देण्यात आली. मात्र माझ्यासोबत काम करण्यासाठी कुठलाही सहाय्यक न दिल्यामुळे मला खूप त्रास होतोय. याबाबत वेळोवेळी अधिकार्‍यांना माहिती देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नंतर प्रत्येक कामासाठी कर्मचार्‍यालाच जवाबदार धरले जाते. वेळोवेळी सहायकांची मागणी करूनही जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाबाबत गंभीर नसल्याचा आरोप जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक लेखाधिकारी शैलेश बेस यांनी २३ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेत कर्मचारी महासंघ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
पत्र परिषदेला कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी अजय खरवडे, कमलेश बिसेन, लीलाधर तिबुडे, मजहर खान, सुभाष खत्री, संतोष तोमर, संतोष तुरकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना बैस यांनी सांगितले की मी ग्रामीण पाणी पुरवठा विभागात सहाय्यक लेखा अधिकारी म्हणून कार्यरत असून मला २0 जुलै रोजी कोविडचे काम करण्यास्तव आरोग्य विभागाचा लेखा विभागाचा कार्यभार देण्यात आला. वेळेत सर्व कार्य पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून मी माहिती काढली असता विभागात कनिष्ठ सहाय्यक लेखा हे एकच कार्यरत असून वरिष्ठ सहाय्यक लेखा हे अपंग कर्मचारी असून मागील एक वषार्पासून रजेवर आहेत. एकूण तीन लेखा कर्मचारी पैकी एकच कनिष्ठ सहायक लेखा कर्मचारी कार्यरत आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दोन कर्मचार्‍याची मागणी केली होती. यावर दोन कर्मचारी उसनवार सेवेसाठी मंजुरी प्राप्त झाली. यातील एक कर्मचारी जी.एस.भोयर कामावर रुजू झाले.मात्र दुसरे कर्मचारी मनोज डोंगरे परिचर, शिक्षण विभाग यांना त्यांच्या विभागातर्फे कार्यमुक्त करण्यात न आल्यामुळे ते आजपर्यंत रुजू होऊ शकले नाही. श्री भोयर हे आदेश झाल्यावर दहा ते पंधरा दिवसानंतर कामावर आले. त्यांना मागील तीन महिन्याचे वेतन न मिळाल्यामुळे अर्जित रजेचा अर्ज देऊन ते रजेवर गेले. अगोदर माझी पगार करा नंतरच मी रुजू होईल असे त्यांनी सांगितले. आज घडीला कोरोना परिस्थितीमुळे आरोग्य विभागाची कामे अत्यंत महत्त्वाची आहेत. सध्या आरोग्य विभागात कर्मचारी नसल्याने येथील लेखाविषयक बाबींची सर्व कामे प्रलंबित आहेत. सध्या चारमाही अंदाजपत्रक तयार करणे अत्यंत महत्त्वाचे असून एकही कर्मचारी नसल्यामुळे अंदाजपत्रक तयार होऊ शकत नाही. अंदाजपत्रक वेळेत वरिष्ठ कार्यालयास सादर न झाल्यास अनुदान उपलब्ध होणार नाही. यापूर्वी देखील या कार्यालयात कार्यरत असलेले सहायक लेखाधिकारी श्री गिर्हे त्यांना अशाच प्रकारच्या मानसिक त्रास झाल्याने त्यांनी स्वेच्छानवृत्ती घेतली होती. लेखा कर्मचारी यांची पदोन्नती होत नाही, व्यापक बदल होत नाही, झाली तर त्यांना नवीन पदी स्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्यास विभाग प्रमुख कार्यमुक्त करत नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांची प्रत्येक विभागात कमतरता दिसत यात आहे. त्याच कारणास्तव कार्यालयीन कामे वेळेत पार पाडण्यात अडचणी निर्माण होतात. अशा प्रसंगी मला एकट्यालाच जबाबदार धरणार असतील तर माझ्या मानसिकतेवर याचा विपरीत परिणाम होईल. त्यामुळे आरोग्य विभागात लेखा कर्मचारी तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. या मुळे जिल्हा परिषद प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून अधिकार्‍्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे.