गोंदिया,दि.24 : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती बिकट झाली. ही स्थिती सुधारण्याकरिता माजी केंद्रीयमंत्री तथा विद्यमान खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राज्यातील जबाबदार मंत्र्यासह अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना स्थितीची जाणीव करून देत आज(दि.24) गृहमंत्र्यांसह तीन मंत्र्यांचे आगमन झाले. जीएमसीत बैठक झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा झाला. परंतु, या सर्व बैठकांपासून पत्रकार आणि पदाधिकाऱ्यांना बाजूला सारण्यात आले.त्यातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आढावा बैठकीच्या नावावर खानापुर्ती करण्यासाठी आलेल्या मंत्र्याकरीता किमान दोनशेच्यावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला होता.
जसे काही प्रधानमंत्री व मुख्यमंत्रीच ही आढावा बैठक घेत आहेत.त्यातच ड़ीन यांच्या कक्षात जेव्हा वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा घेतला जात होता,त्याचवेळी त्या परिसरातील वर्हांड्यात अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.काही लोकप्रतिनिधींचे स्विय सहाय्यकही उपस्थित होते.परंतु पोलिसांनी आपल्या चांगल्या दादागिरीचा परिचर गृहमंत्र्याच्या सुरक्षेच्या नावावर दाखवत एका वरिष्ठ अधिकायाला व खासदाराच्या स्वीय सहाय्यकालाच बाहेर काढले.जेव्हा ते वरिष्ठ अधिकारीच कोरोना काळात महत्वाचे अधिकारी असताना पोलिसांची त्यांना बाहेर जा म्हणेपर्यंत गेलेली मजल ही जिल्ह्यासाठी शोभनीय नाहीच.त्यातच मंत्र्यांनी पत्रकांरांना जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःबोलावले असतांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या महिला पोलीस निरिक्षकांनी तर चक्क जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या 20 जणांच्या यादीशिवाय कुणीच आत जाणार नाही असे म्हणत म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी,भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे,जिल्हा परिषदेचे माजी गटनेते गंगाधर परशुरामकर यांच्यासह अनेकांना आपला रुबाब दाखवत परत पाठवले.उपविभागीय अधिकारी यांना देखील प्रवेश नाकारल्याने एवढे गूढ होते तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे.यासर्व गोंधळानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना मात्र जिल्हाधिकार्यांनी मी तो नव्हेच असे केले त्या सर्व प्रकारावर मात्र खासदार प्रफुल पटेलांनी पडदा घालण्याचे काम केले.

कोरोना(कोविड १९) संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण शून्य होते. त्यानंतर तीन महिन्यापर्यंत गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. त्यानंतर मात्र जून महिन्यापासून गोंदियात कोरोनाचे रूग्ण वाढणे सुरू झाले. ऑगस्ट महिन्यापासून गोंदियात कोरोना विषाणूने कहर केला. सप्टेंबरच्या सुरुवातीपासून दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. बुधवारी ३४० आणि आज(दि. २४) ३०५ बाधित आढळून आले. आजतागातय ८० बाधितांचा मृत्यू झाला. ही स्थिती गोंदिया जिल्ह्याची चिंता वाढविणारी आहे. शासकीय रुग्णालयातील अव्यवस्था आणि डॉक्टरांची कमतरता यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या स्थितीवर लोकप्रतिनिधींनी लक्ष वेधले. १५० खाटा केटीएस रुग्णालयात बसविण्यात आल्या. परंतु, त्यात देखील रुग्णसेवा बरोबर नाही. ही स्थिती लक्षात घेता माजी केंद्रीयमंत्री तथा विद्यमान खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राज्य शासनाशी संपर्क साधून जिल्ह्याची स्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री अनील देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमीत देशमुख यांना जिल्ह्यात पाचारण केले. मंत्रीद्वय आज जिल्ह्यात दुपारी चार वाजताच्या सुमारास पोहोचले. आल्या-आल्या ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पोहोचले. याठिकाणी सामाजिक कार्याकर्ते, पत्रकार आणि लोकप्रतिनिधी तसेच नागरिक येथील अव्यवस्थेची माहिती देण्याकरिता आधीच उपस्थित होते. परंतु, त्यांना लक्षात न घेता(नव्हे पोलिसांच्या आडमुठेपणामुळे) मंत्र्यांनी जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दौरा केला. तब्बल तासभर त्यांनी कोणती समिक्षा केली, हे त्यांनाच ठाऊक. लोकप्रतिनिधी आणि पत्रकार दूरच चक्क गोंदियाच्या उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपंते यांना देखील आतमध्ये जाऊ दिले नाही, त्यामुळे हा दौरा नेमका होता कशाकरिता, अशी चर्चा सुरू आहे.
वैद्यकीयमंत्र्यांना विमानाची घाई
राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमीत देशमुख देखील आजच्या दौऱ्यात होते. डीसीएसचा दौरा करण्याकरिता ते जात असताना पत्रकारांनी त्यांना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना रुग्णांशी होणाऱ्या दुर्लक्षाबाबत प्रश्न विचारले. दरम्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या आढावा बैठकीत माहिती देतो म्हणाले. मात्र जीएमसीतील सीटी स्कॅन मशीनचे उद्घाटन करून आपल्या विमानाची वेळ होत असल्याचे सांगून ते निघून गेले. त्यामुळे त्यांच्या येण्यामुळे जिल्ह्याला उपयोग तरी काय झाला? असेच म्हणावे लागेल.
जिल्हाधिकारी कार्यालयातही टाळेबंदी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि केटीएस रुग्णालयाचा दौरा आटोपल्यानंतर मंत्री महोदयांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. किमान जिल्हाधिकारी कार्यालयात तरी प्रश्नोत्तर होईल, या अपेक्षेने पत्रकार आणि पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. तिथे देखील सर्वांना प्रवेशद्वारावरच रोखून ठेवण्यात आले. त्यामुळे हा दौरा फक्त शासकीय दिखाव्याकरिता होता, हे विद्यमान सरकारातील राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेसचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी तसेच पत्रकार देखील म्हणत आहेत. या दौऱ्याचे फलित काय असणार हे बघावे लागणार आहे.