गोंदिया दि.25- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. वाढत्या कोरोना संसर्गामुळे रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांकडे दुर्लक्ष न करता सामान्य रुग्णालाही दिलासा मिळेल असे काम करा. असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
24 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात कोविड-19 संदर्भात जिल्ह्याचा आढावा घेतांना आयोजित सभेत श्री. टोपे बोलत होते. यावेळी खासदार प्रफुल पटेल, गृहमंत्री तथा पालकमंत्री अनिल देशमुख,आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, मनोहरराव चंद्रिकापुरे, सहेषराम कोरोटे, राजू कारेमोरे, प्रकाश गजभिये, माजी खासदार डॉ.खुलाल बोपचे, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आरोग्यमंत्री श्री टोपे पुढे म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवावे. लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवावे. रॅपिड ॲन्टीजेन व आरटी-पीसीआर चाचण्यांवर भर देण्यात यावा. गोंदियात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्लाझ्मा लॅब लवकर सुरू करण्याबाबत मुंबई येथील बैठकीत निर्णय घेतण्यात आला. जिल्ह्यासाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू करावा.तसेच जिल्ह्यात टास्क फोर्स समिती स्थापन करण्यात यावी असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात सॅम्पल टेस्टींगला 5 ते 6 दिवस लागतात ही फार गंभीर बाब असल्याचे सांगून श्री.टोपे म्हणाले की, चाचणीचा अहवाल 24 तासाच्या आत आला पाहिजे. कोणत्याही बाधित व्यक्तीला जास्तीचा खर्च येणार नाही याकडे लक्ष देवून सकारात्मक दृष्टीने काम करावे. बाधित रुग्णांना जास्त दर आकारण्यात येते हे योग्य नाही. रुग्णासाठी शासनाने जे दर निर्धारित केले आहेत तेच दर आकारण्यात यावे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये रुग्णाला कॅशलेस सेवा दिली पाहिजे. यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष लक्ष्य घालून काम करावे असे ते म्हणाले.
डॉक्टर्स, नर्सेस व टेक्नीशियनची शंभर टक्के पदे भरण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.असे सांगून श्री.टोपे म्हणाले की, बाधित रुग्णांकडे दुर्लक्ष करु नका. त्यांना दिलासा मिळेल असे काम करा. कोरोनाबाबत यंत्रणांनी सकारात्मक दृष्टीने व जबाबदारीने कामे करावीत. रुग्णवाहिके संदर्भात तक्रार येता कामा नये. यासाठी खाजगी रुग्णवाहिका जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घ्याव्यात. बाधित रुग्णांना गरम व पौष्टिक आहार मिळाला पाहिजे. कोरोना केअर सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची नियमीत आरोग्य तपासणी केली पाहिजे. सामान्य माणसाला आधार मिळावा यासाठी सर्व यंत्रणांनी टिम वर्क म्हणून काम केले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री श्री देशमुख म्हणाले, जिल्ह्याचा डब्लींग रेट व रिकव्हर रेट फार कमी आहे. यासाठी टेस्टींग वाढविल्या पाहिजे. कोविड प्रायव्हेट दवाखान्यात जिल्हा प्रशासनाचा अधिकारी ठेवावा. काही अडचणी आल्यास पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी. नागरिकांनी मास्क वापरले नाही तर त्यांच्यावर आता 500 रुपये दंड आकारण्यात यावा. कोविड-19 संसर्गापासून स्वत:ला व आपल्या कुटूंबाला वाचविण्यासाठी सतत मास्कचा वापर करावा. मास्कशिवाय घराबाहेर पडू नये. सार्वजनिक ठिकाणी किमान दोन मीटरचे शारिरीक अंतर राखून नियमाचे पालन करा. हात वारंवार धुवा. हात धुण्याची सोय नसलेल्या ठिकाणी उदा. प्रवासात सॅनिटायजरचा वापर करावा. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार स्पर्श करणे टाळावे. ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून तपासणी करावी. मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार असल्यास दररोज तापमान मोजावे. डॉक्टरांकडून नियमीत तपासणी करुन घ्यावी असे त्यांनी सांगितले.
खासदार प्रफुल पटेल म्हणाले, बाधित रुग्णांकडे दुर्लक्ष करु नये. त्यांना दिलासा मिळेल असे काम करावे. काही अडचणी आल्यास पोलीस प्रशासनाची मदत घेण्यात यावी. यंत्रणांनी सकारात्मक दृष्टीकोनातून काम करावे. यावेळी त्यांनी ऑक्सीजन सिलिंडरच्या काळा बाजाराची दखल घेत असे कृत्य करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे असेही यावेळी म्हणाले.
आमदार अग्रवाल म्हणाले, बाधित रुग्ण जेव्हा जिल्हा सामान्य रुग्णालयात जातो तेव्हा त्याला उपचार बरोबर मिळत नाही. कोणताही डॉक्टर त्या रुग्णाला हात लावायला तयार होत नाही अशी परिस्थिती आहे. यावर आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, डॉक्टरांनी ऐकले नाही तर त्यांची नर्सिंग होमची लायसन्स रद्द करण्यात यावी. आय.सी.यु. बेड वाढविण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात ॲम्बुलन्सची कमतरता आहे.ही बाब यावेळी आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
आमदार चंद्रिकापुरे म्हणाले, मास्क न वापरल्यास नागरिकांवर दंड आकारण्याबाबत पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे. स्त्रीयांना डिलीव्हरीसाठी एक-दोन दिवस बाहेर बसावे लागते याकडे प्रशासनाने लक्ष्य देवून समन्वयातून काम करावे असे त्यांनी सांगितले.
आमदार कोरोटे म्हणाले, बाधित रुग्णांकडे दुर्लक्ष केले जाते. रुग्णाला जेवण वेळेवर मिळत नाही. याकडे प्रशासनाने लक्ष दयावे. कोरोना व्यतिरिक्त दुसऱ्या आजारांवर सुध्दा लक्ष देण्याची गरज आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी कोरानाबाबत जिल्ह्याच्या परीस्थितीबाबत सादरीकरणाद्वारे विस्तृत माहिती दिली. तसेच ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व कुटुंबाचे सर्व्हे सुरु करण्यात आले असून डाटा ऐन्ट्रीचे काम ऑनलाईन करण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते माझे कुटुंब – माझी जबाबदारी या मोहीमेवर आधारित पोस्टर्सचे विमोचन करण्यात आले.
सभेला आरोग्य उपसंचालक डॉ.संजीव जयस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भूषणकुमार रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे,उपजिल्हाधिकारी राहुल खांदेभराड,जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी पंकज गजभिये, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, डॉ.हिंमत मेश्राम, डॉ.वेदप्रकाश चौरागडे, गोंदिया उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, अर्जुनी/मोरगाव उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसिलदार राजेश भांडारकर, अपर तहसिलदार अनिल खडतकर उपस्थित होते.