बाई गंगाबाईत डिलिव्हरी कक्षाचे उद्घाटन;केटीएसमध्ये सीटी-स्कॅन मशीनचे लोकार्पण

आरोग्य मंत्री टोपे,वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख, पालकमंत्री देशमुख आणि खा.पटेल यांची वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

0
195

गोंदिया दि.25- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासोबतच बाधित रुग्णांना आवश्यक त्या सुविधा तसेच आरोग्याच्या अन्य सुविधा देखील उपलब्ध व्हाव्यात यासाठी आज आरोग्यमंत्री राजेश टोपे,वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, पालकमंत्री अनिल देशमुख आणि राज्यसभा सदस्य खा.प्रफुल पटेल यांनी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाला भेट दिली.

सर्वप्रथम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आगमन होताच अधिष्ठाता यांचे कक्षात जिल्ह्यातील कोरोनाबाबतची सद्यस्थिती आणि करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी श्री.मीना यांचेकडून जाणून घेतले.

आरोग्य मंत्री श्री.टोपे यावेळी म्हणाले की,जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील एम.बी.बी.एस चे रिक्त पदे भरण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून कंत्राटी पद्धतीने त्या डॉक्टरांचे दरमहा मानधन ७५ हजार रुपये असे निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यात कायमस्वरूपी एम.बी.बी.एस डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी यांनी करावी.असे त्यांनी यावेळी सांगितले.

बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाला मान्यवरांनी भेट देऊन गर्भवती महिलांच्या डिलिव्हरी कक्षाचे उद्घाटन केले. यावेळी वार्डात उपस्थित महिला रुग्णांशी संवाद साधून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात २ कोटी ९० लक्ष रुपयांच्या सिटी-स्कॅन मशीनचे लोकार्पण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार विनोद अग्रवाल,आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे, माजी.खा.डॉ.खुशाल बोपचे,माजी आ.राजेंद्र जैन,आमदार राजू कारेमोरे,आमदार प्रकाश गजभिये,जिल्हाधिकारी दिपक कुमार मीना,आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ.संजीव जयस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भूषणकुमार रामटेके,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.