चिचगड,(सुभाष सोनवने)दि.25ः-देवरी तालुक्यातील चिचगडसह व गाव परीसराच्या १८ गावात सुरु असलेली दारु विक्री बंद न केल्यास देवरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा परिसरातील सुमारे १५०० महिलांनी प्रशासनाला दिला आहे.तालुक्यापासून जिल्हाप्रशासनापर्यंत अनेकदा निवेदन सादर करुनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आता प्रशासनाच्या विरोधातच लढा उभारण्याची तयारी दारुबंदीकरीता लढणार्या महिलांनी केली आहे.
चिचगड क्षेत्रातील व स्थानिक चिचगड येथील सुमारे १५०० महीलांनी गावात सुरु असलेल्या दारु विक्रीमुळे घरातील पुरुषावर व मुलावंर वाईट परिणाम होत असल्याचे सांगत ते दारुदुकाने बंद करण्यासाठी यापुर्वी निवेदन सादर करण्यात आले.परंतु त्या निवेदनाकडे लोकप्रतिनिधी,पोलीस,महसुल व राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप या महिलांनी केला आहे.दारूमुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दारु पिणारे व्यक्ती हे अश्लील शिवीगाळ करीत असून महिलांना मारहाण करीत असल्याचे या महिलांनी म्हटले आहे.