गडचिरोली दि. 26 : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” अभियानांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 35,481 कुटुंबातील 1 लाख 22 हजार 516 जणांची तपासणी करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहीम 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर व 14 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत दोन टप्प्यात राबविण्यात येत असून या माहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर रोजी सुरु झाला आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 11 लक्ष 32 हजार 828 नागरिकांची तपासणी होणार आहे. आत्तापर्यंत 1 लाख 22 हजार 516 जणांच्या तपासणीनंतर 224 जण सारी व आयएलआयचे व्यक्ती मिळाले. तसेच ऑक्सीजन पातळी आवश्यक 95 पेक्षा जास्त नसलेले 640 जण मिळाले आहेत. यातील संभावित रूग्ण म्हणून 250 जणांना आशा व पथकाने जवळच्या कोविड केअर सेंटरला संदर्भित केले आहे. त्याठिकाणी त्यांची पुढील चाचणी होणार आहे.
या मोहिमेंतर्गत तालुकानिहाय तपासणी करण्यात आलेल्या घरांची व कुटुंबातील सदस्यांची माहिती – अहेरी – 1361 (5046), आरमोरी – 2930 (11093), भामरागड -1107 (3311), चामोर्शी – 6394 (21125), धानोरा – 6031 (21368), एटापल्ली – 574 (2399), गडचिरोली – 3372 (9622), कोरची- 2381 (8192), कुरखेडा -5825 (18987), मुलचेरा – 129 (274), सिरोंचा – 1838 (2001) व वडसा 3444 (10009).
या मोहिमेंतर्गत प्रशासनाने नियुक्त केलेल्या पथकाद्वारे घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन आणि को-मॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेतली जात आहेत. तसेच ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भित करण्यात येऊन तेथे कोविड-19 च्या तपासणीसाठी चाचणी करुन पुढील उपचार केले जातील.
नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत मास्क वापरणे आवयक आहे. तसेच हात साबण किंवा सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नये. कोरोना सदृश लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या रुग्णालयात जावून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांचा कसारी उपकेंद्र शंकरपूर ग्रामपंचायत येथे मोहिमेत सहभाग : यावेळी कुमार आर्शीवाद म्हणाले, जिल्हयात 952 आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांव्दारे सर्व्हेक्षण सुरू आहे. अजून मोठया प्रमाणात लोक जोडले जात आहेत. मौजे कसारी उपकेंद्र शंकरपूर येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी मध्ये सहभागी आशा व आरोग्य कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे मोहिमेला गती दिली आहे. जिल्हयात सर्वच तालुक्यात आता उद्दीष्टाप्रमाणे गृहभेटी देणे सुरू झाले आहे. यातून समोर आलेल्या सारी/आयएलआय तसेच ऑक्सीजन पातळी कमी असलेल्यांना वेळेत संदर्भिय सेवा दिली जाईल.