आजपासून सामाजिक अंतर न पाळणाऱ्या आणि मास्क न वापरणाऱ्याला होणार ५०० रुपये दंड

0
346

गोंदिया,दि.26ः) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 13 मार्च 2020 पासून लागू करण्यात आला. जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. या दरम्यान नागरिकांचे मुक्तपणे बाजार परिसरात गर्दी करणे, चौकात एकत्रीत बसणे, सुरक्षीत सामाजिक अंतर न ठेवणे, मास्क न लावणे इत्यादी प्रकारच्या बाबी निदर्शनास येत आहेत.

नागरिकांकडून कोविड-19 संदर्भात निर्गमीत करण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे देखील निदर्शनास आले आहे. त्यामुळे या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून गोंदिया जिल्ह्यात सुरक्षीत सामाजिक अंतर न पाळणाऱ्या व मुखपट्टी (मास्क) न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करुन प्रति व्यक्ती 500 रुपये दंड आकारण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी काढले आहे.

कोरानाविरुध्द लढा दयायचा असेल तर सर्व नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित व्यक्ती तसेच आस्थापना यांचेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल.