Home विदर्भ गोंदियाला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री बडोले

गोंदियाला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री बडोले

0

क्लिन गोंदिया ह्न क्लिन इंडियाचा शुभारंभ
गोंदिया, दि. ९ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारताचा संकल्प केला आहे. हा संकल्प प्रत्यक्षात आणून देशभर स्वच्छतेची मोहिम राबविण्यात येत आहे. चांगल्या आरोग्यासाठी परिसर स्वच्छ असणे आवश्यक आहे. गोंदिया शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
आज ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून दै. भास्कर वृत्तपत्र समुह, जिल्हा प्रशासन गोंदिया नगर परिषद गोंदिया व सेवाभावी संघटना यांच्या संयुक्त वतीने क्लिन गोंदिया ह्न क्लिन इंडियाचा शुभारंभ करतांना गोंदिया येथील स्वातंत्र्य सैनिक स्व. जमनालाल बजाज पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बडोले बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी, गोंदिया नगराध्यक्ष कशिश जायसवाल, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, नगर पालिकेचे मुख्याधिकारी जी.एन.वाहुरवाघ, इंडियन मेडिकल असोशिएनशनचे जिल्हाध्यक्ष डॉ.घनश्याम तुरकर यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले म्हणाले, गोंदिया शहरात मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वच्छतेची सुरुवात आपल्या घर व परिसरातून करावी. स्वच्छता अभियान ही निरंतर चालणारी चळवळ असावी. स्वच्छतेच्या चळवळीत प्रत्येकाने सहभागी व्हावे असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, गोंदिया शहराला लागलेला अस्वच्छतेचा शिक्का या निमित्ताने मिटविता येईल. सर्वांच्या सहकार्याने शहर स्वच्छ होण्यास मदत होईल. स्वच्छता असली तर आजार दूर पळतील. प्रत्येक आठवडयात रविवारी वार्डातील नागरिकांनी एकत्र येवून वार्डाच्या स्वच्छतेसाठी काम करावे. आपले शहर स्वच्छ व सुंदर राहील याचा सर्वांनी संकल्प करावा. असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
मनोहर मुन्सीपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, मनोहर मुन्सीपल हायर सेंकडरी स्कूल, एस.एस.गर्ल्स हायस्कूल व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता विषयक रॅली काढून अभियानात सहभाग घेतला.
प्रारंभी पालकमंत्री बडोले यांनी स्वातंत्र्य सैनिक स्व. जमनालाल बजाज यांच्या पुतळयाला पुष्पाहार अर्पण केला. यावेळी त्यांनी स्वच्छ गोंदिया स्वच्छ भारताचा शुभारंभ करण्यात येत असल्याची घोषणा केली.
उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, तहसिलदार संजय पवार, नगरसेवक, पोलीस विभागाचे अधिकारी, शहरातील विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, शाळा, महाविद्यालयाचे शिक्षक, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
प्रास्ताविक श्रीमती अनिता पड्डुलवार यांनी केले. सुत्रसंचालन संतोष शर्मा यांनी तर उपस्थितांचे आभार नविन अग्रवाल यांनी मानले. गोंदिया शहरातील सर्व प्रभागामध्ये नगरसेवकांच्या नेतृत्वात हे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.

Exit mobile version