
नागपूर दि.16 : कोरोना आजारावर लस येईपर्यंत कोरोना पासून दूर राहावे यासाठी लोकसहभागातून लोक प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागपूर जिल्हा प्रशासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अंतर्गत पुढाकार घेऊन सुरू केलेल्या ‘माझे कार्यक्षेत्र माझा पुढाकार’ या मोहिमेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक यांना पत्र पाठवून ‘माझे कार्यक्षेत्र माझा पुढाकार’ या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांनी तयार केलेल्या या पत्रामध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ यासाठी गावागावात घराघरात सुरू असलेल्या सर्वेक्षणामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविली जात आहे.
या पत्रामध्ये कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या जीविताचे व आरोग्याच्या रक्षणाकरिता सुरू असलेल्या या मोहिमेत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे याकरिता पदाधिकाऱ्यांनी प्रोत्साहित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या सर्वेक्षण कार्यक्षेत्रातील सामाजिक बांधिलकी असलेल्या स्वयंसेवकांचा सहभाग व्हावा, कोरोनाग्रस्त उपचारासाठी पुढे यावेत, योग्य उपचार व्हावा, त्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांकडे आवश्यक दूरध्वनी क्रमांकाची माहिती देखील या पत्रामध्ये देण्यात आली आहे. या पत्राच्या मागील बाजूस यासंदर्भातील आवश्यक सर्व दूरध्वनी क्रमांक नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे या क्रमांकांचा वापर करून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात पदाधिकाऱ्यांनी राहावे.
यासोबतच आपापल्या क्षेत्रातील संपर्कातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रेरित करण्याचा आग्रह देखील करण्यात आला आहे. मास्कचा वापर करणे, दोन हात अंतर ठेवणे, वारंवार साबणाने हात धुणे, गरज नसेल तर घराबाहेर न पडणे, अशा सूचना करण्याची विनंती करण्यात आली आहे.
सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या या पत्रा मागील दूरध्वनी क्रमांक आपल्या सोबत ठेवावेत. आवश्यकतेनुसार आपापल्या क्षेत्रातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती देखील करण्यात आली आहे.