गोंदिया,दि.28 : कोरोनाची दहशत कायम आहे. मात्र मातृ सुरक्षेवरही शासन भर देत आहे. गरोदर मातांकडून प्रसूतीकरिता शासकीय रुग्णालयांत पैसे घेतले जात नाही. मात्र येथील बाई गंगाबाई रुग्णालयात प्रसूतीकरिता डॉक्टरांना लागणारे सुरक्षा कवच म्हणजे ग्लोव्ज आणि इतर साहित्य रुग्णालाच बाहेरून घेवून आणावे लागत असल्याचा प्रकार सुरू आहे. या लूटीच्या प्रकाराकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे.
महिलांकरिता जिल्हा स्तरावर गोंदिया येथे बाई गंगाबाई शासकीय रुग्णालय आहे. हे रुग्णालय नेहमी कसल्या ना कसल्या कारणाने चर्चेत असते. रुग्णांची लूटमार हा येथील नित्याचा प्रकार आहे. महिनाभरापूर्वी येथून महिला रुग्णांची प्रसूती न करता रेफर टू चा सल्ला देण्यात येत होता. यावर मोठ्या प्रमाणात टिका झाली होती. शासन आणि प्रशासनाने याची दखल घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर कुठे हे प्रकरण शमले. येथे प्रसूती सुरू झाली. सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे दक्षता घेणे गरजेचे आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लागणारी सुरक्षेची साधने प्रशासनाने पुरविणे गरजेचे आहे. मात्र या रुग्णालयात त्या साधनांवर लागणाऱ्या खर्चाचा भूर्दंड रुग्णांकडून वसूल करण्यात येत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सिझेरियन प्रसूतीसाठी येथे कार्यरत डॉक्टर चिठ्ठी लिहून ते साहित्य बाहेरून खरेदी करून आणण्यास सांगतात. ते साहित्य अडीच हजार रुपयांचे होईल, असे देखील त्याच वेळी सांगण्यात येते. साहित्य एका ठराविक दुकानातून खरेदी करण्याचाही आग्रह डॉक्टर करतात. आधीच कोरोना संकटामुळे नागरिकांच्या हातचा रोजगार हिरावला आहे. त्यातच येथे प्रसूतीकरिता येणारे बहुतांश कुटुंब गरीब आहेत. अशात दुष्काळात तेरावा महिना म्हणून त्यांची रुग्णालयात लुबाडणूक करण्यात येत असल्यामुळे नागरिक रोष व्यक्त करत आहेत. बाई गंगाबाई महिला रुग्णालयात सुरू असलेल्या प्रकाराकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दुर्लक्ष केले आहे.
साहित्य पुरवठा करणारा दलाल हजर
प्रसूतीसाठी महिलांना नेण्यापूर्वी साहित्य खरेदी करून आणण्याचा सल्ला दिला जातो. त्याचवेळी एका ठराविक औषध दुकानातील व्यक्ती तिथे उपस्थित असतो. पैसे द्या, मी तत्काळ साहित्य उपलब्ध करून देतो असे तो व्यक्ती सांगतो. महिला रुग्णाचे कुटुंबीय देखील त्याला पैसे देवून साहित्य खरेदी करतात.