अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ट्रॅक्टरचे वितरण

0
220

वाशिम, दि. २८ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. या योजनेच्या तीन लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या हस्ते आज, २८ ऑक्टोबर रोजी ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज, ‘नाबार्ड’चे जिल्हा महाव्यवस्थापक विजय खंडरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, कौशल्य विकास अधिकारी जी. पी. चिमणकर, महामंडळाचे जिल्हा समन्वयक अमोल मरेवाड, आयशर ट्रॅक्टरचे डीलर रमेश वानखेडे यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांचे हस्ते वाशिम येथील मधुकर जाधव, रिसोड तालुक्यातील सवड येथील निलेश काकडे, मानोरा तालुक्यातील गिरोली येथील प्रवीण शिंदे या तीन शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.

जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.  म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या कर्ज व्याज परतावा व गट प्रकल्प कर्ज योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना देण्यासाठी प्रयत्न करावा. या योजनेंतर्गत कर्ज उपलब्ध करण्यासाठी बँकांनी सुद्धा सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करावे, जेणेकरून महामंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांना स्वतःचा लघुउद्योग, कृषि सलंग्न व्यवसाय सुरु करण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच महामंडळाच्या योजनेतून ट्रॅक्टरचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी आपले कृषि, कृषि सलंग्न उत्पन्न वाढविण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग करून इतरांनाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

सहाय्यक आयुक्त श्रीमती बजाज म्हणाल्या, मराठा समाजातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास युवक-युवतींना आर्थिक सहाय्य पुरविण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत कर्ज व्याज परतावा व कर्ज योजना राबविण्यात येते. उद्योजकतेला चालना देण्यासाठी या योजना उपयुक्त असून  उदयोआहेत. इच्छुक उमेदवारांनी ‘महास्वयंम’ (www.mahaswayam.gov.in) या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.