गोंदिया:दि.१५::- सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी कुटुंबीयांसमवेत दिवाळीचा आनंद साजरा करीत असतानाच नागरीकांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी पोलिसांना मात्र दिवाळी यावेळी एक दिवाळी आदिवासीसोंबत हे ब्रीद घेत यावेळच्या दिवाळीत नक्षलग्रस्त अतिदुर्गम गावातील आदिवासीं बांधवांना कोरोनाच्या काळातील आर्थिक संकटाची बाजू लक्षात घेत दिवाळीउपयोगी साहित्य आणि मिठाई,शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूसंह साडी,धोतर आदी साहित्यांचे वितरण करुन लक्ष्मीपुजनापासून तर भाऊबिजेंपर्यंत हा सण त्यांच्यासोबत साजरा करण्यास सुरवात केली आहे.पोलीस अधिक्षक विश्व पानसरे आणि अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम उपविभागीय पोलीस अधिकारी जालंदर नालकुल आणि नक्षलग्रस्त भागातील सर्व ठाणेदार,दुरक्षेत्र चौकीतील प्रभारी पोलीस अधिकारी यांनी राबवून एक नवीन संदेश दिला आहे.या सामाजिक कार्यात विविध सामाजिक संघटनांनी मदत केली यामध्ये गोंदिया व नागपूर येथील संस्थांचाही सहभाग आहे.गेल्यावर्षी पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम राबवण्यात आलेला होता,हे विशेष.

दिवाळीसाठी इतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्या मिळत असल्याने सर्वांना आनंदोत्सव साजरा करता येतो. मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच रात्रीची गस्त घालून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणारे पोलिस दिवाळीत २४ तास ड्युटीवर पहायला मिळतात.
सदर उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील देवरी,चिचगड,केशोरी,सालेकसा,नवे गावबांध व डुग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अतिदुर्गम भागातील ६२ गावापैकी ४८ गावामध्ये दिवाळीची भेट म्हणून पोलीस विभागाच्यावतीने २००५ साड्या,२००५ ब्लाँकेट,७७५ टी शर्ट,२५०धोतर,७५० टिपीन,२००० मास्क,५० व्हाँलीबाँल किट,१९८ क्रिकेट किट,२००० चप्पल,जुते,५० फुटबॉल किट,७०० स्कुलबँक,९५० स्टील ग्लास,६५० पानी बॉटल,२०१० मिठाई बॉक्स,फरसान यांच्यासह जिवनावश्यक वस्तु व मुलांना शालेय आणि खेळाचे साहित्य वितरित करण्यात आले.या सर्व मोहिमेत पोलीस कर्मचारी,अधिकारी,सी 60 जवानांचे पथक,संबधित गावातील पोलीस पाटील,सरपंच,ग्रामसेवक व विविध मंडळाचे पदाधिकारी सहभागी झालेले होते.