
तिरोडा : आवरभिंत व इमारतीचे बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत गोंदिया तालुक्यातील दवनीवाडा येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मंजूर करण्यात आले होते. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. तसेच काम पूर्ण न करताच बिल काढून 15 लाखांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याची तक्रार अण्णा चौधरी, उपसरपंच गंगासागर मंडले, इतर सदस्य व गावकर्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली आहे.
बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर
कोरोना काळात काम बंद करण्याचे आदेश असतानाही ग्रामपंचायतीने विनापरवानगी काम सुरूच ठेवले. सीमेंटऐवजी अदानी पॉवरमधील राखेचे (भसवा माती मिश्रित रेती) मिश्रण बांधकामासाठी उपयोगात आणण्यात आले. त्यामुळे संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. विटा जोडणीच्या ठिकाणी हात लागताच तेथील मिश्रण बाहेर निघते. भीम (पाया) मध्ये 20 एम.एम., 40 एम.एम. दगडाचा वापर न करता चुरीचा वापर करण्यात आला. तसेच खाली लोखंडी चटई व वापरता बांबू वापरण्यात आले आहे.
पैशाचा अपहार व अपघाताची शक्यता
ग्रामसेवकाने कंत्राटदार सरपंच कलू मस्करे यांना सभेची मंजुरी न घेता, सदस्यांना माहिती न करता साटेलोटे करून काम होण्यापूर्वीच 14 लाख 80 हजार 330 रुपयांचे देयक दिले. सध्या आता कामाला सुरुवात करण्यात आली आहे. काम संपूर्ण निकृष असल्याने आवरभिंत, इमारत कधी पडेल याचा नेम नाही. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी आवारभिंतीकडे गेल्यास अघटित घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वरिष्ठांपासून कनिष्ठापर्यंत कमिशनखोरी
कनिष्ठ अभियंता ठवकर सेवानिवृत्त झाले. त्यांनी मोजमाप पुस्तिकेत काम होण्यापूर्वीच काम पूर्ण झाल्याचे 7 ऑगस्ट 2020 रोजी कसेकाय दाखविले, झोपेत मोजमाप पुस्तिका तयार केली काय? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. सदर बिलावर कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता यांची स्वाक्षरी आहे. त्यांनी सुद्धा काम न बघता, चौकशी न करता झोपेतच स्वाक्षरी केली केल्याचे बोलले जाते. यात वरिष्ठांपासून कनिष्ठापर्यंत कमिशनखोरी झाल्याचे दिसून येत आहे.
काम बंद करण्याचे आदेश
या बांधकामाची तक्रार अण्णा चौधरी, उपसरपंच गंगासागर मंडले, इतर सदस्य व गावकर्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली. तक्रारीची दखल घेताच सदर प्रकरण समोर आले. चौकशीसाठी दुसरे अभियंता पटले यांनी कामाची तपासणी केली असता ते सुद्धा चकित झाले. संपूर्ण काम निकृष्ट असून सुरू असलेले काम बंद करण्याचे आदेश ग्रामसेवक प्रमोद बिसेन व सरपंच मस्करे यांना लेखी पत्राद्वारे देण्यात आले.
आवारभिंत पाडा, निलंबनाची कारवाई करा
संबंधित कामाची पूर्व चाचणी झाल्यावर गुणवत्ता नियंत्रक अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांचा अहवाल प्राप्त झाल्यावरच होईल. पण संपूर्ण आवरभिंत पाडल्याशिवाय पर्याय नाही. पुन्हा नवीन आवरभिंत तयार करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांची व तक्रारदारांची आहे. तसेच संबंधित कामाचे सरपंच हे कंत्राटदार असून तेच काम करीत आहेत. ग्रामसेवक सदस्यांना विश्वासात न घेता खोटे बोलून काम करीत आहेत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अपहार झालेल्या पैशाची वसूली करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आहे. सदर प्रकरणाबाबत कनिष्ठ अभियंता बिसेन व सेवानिवृत्त अभियंता ठवकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.