विधान भवन मुंबईच्या मध्यवर्ती सभागृहात बोलले भंडारा जिल्ह्यातील २ युवक

वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि युवक बिरादरी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने अभिरुप युवा संसदेच्या सादरीकरणाचे आयोजन

0
136

भंडारा,दि.१५-वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि युवक बिरादरी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने अभिरुप युवा संसदेच्या सादरीकरणाचे आयोजन विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात करण्यात आले होते.

युवक बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाच्या सादरीकरणाचे परीक्षक म्हणून निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, अर्थतज्ज्ञ – शिक्षणतज्ज्ञ आणि माजी राज्यसभा सदस्य डॉ.भालचंद्र मुणगेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री अदिती तटकरे विषेषत्वाने उपस्थित होत्या तसेच वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, युवक बिरादरीच्या संचालक स्वर क्रांती आणि आशुतोष शिर्के प्रामुख्याने उपस्थित होते.

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनीही या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी ऑनलाईन माध्यमातून शुभेच्छा दिल्या. यावेळी विजेत्यांना पुरस्कार आणि सर्व सहभागी युवकांना प्रमाणपत्र देण्यात आले.

यापूर्वी युवक बिरादरी भारत या संस्थेच्या वतीने अभिरूप युवा संसदेचे आयोजन जिल्हा स्तरावर, विभागीय स्तरावर करण्यात आले होते. विभागीय स्पर्धांमधून पुढे गेलेल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरातील निवडक ३६ युवकांना विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात संसदेप्रमाणे कामकाज करण्याची संधी यामाध्यमातुन लाभली. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील प्रशांत वाघाये आणि कमल साठवणे या दोन युवकांचा समावेश राज्यातील निवडक ३६ युवकांमध्ये होणे ही निश्चितच आपल्या जिल्ह्यासाठी गौरवाची गोष्ट आहे.

या अभिरुप युवा संसदेत लोकसभा अध्यक्ष, प्रधानमंत्री, मंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार, संसदीय सचिव अशा सर्व भूमिका युवकांनी निभावल्या. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील प्रशांत वाघाये व कमल साठवणे हे विरोधी पक्षाच्या बाजूने होते. ज्या पद्धतीने संसदेत खाजगी विधेयक सादर केले जाते त्याप्रमाणे विरोधी पक्षाचे खासदार म्हणून प्रशांत वाघाये यांनी “निर्माणस्नेही 2022” हे विधेयक या अभिरुप युवा संसदेत सादर केले. विधेयकाच्या बाजूने झालेल्या चर्चेत विधेयकाची सकारात्मकता कमल साठवणे यांनी मांडली.

नेतृत्व, वक्तृत्व, ज्ञान आणि मूल्ये यांची सांगड घालत तरूणांच्या माध्यमातून शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न अभिरूप युवा संसदेच्या माध्यमातून होत आहे. यशस्वी व्हायचे असल्यास प्रामाणिकपणा आणि चिकाटी असणे गरजेचे आहे. बालपणापासूनच सामाजिक वातावरणात सक्रिय असल्यास विचारधारा तयार होते. लोकशाहीची मूल्ये अभिरूप युवा संसदेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत असल्याचे क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले तसेच तरूणांनी उत्कृष्ट असे अभिरूप संसद त्यांच्या सादरीकरणातून उभे केले. त्यांच्या सादरीकरणातून विधानभवनातील या ऐतिहासिक वास्तुबद्दल आत्मीयता आणि अभिमान दिसून आला. अभिरुप संसदेत मांडलेले विविध विधेयक हे नवी दिशा देणारे आहे. लोकशाही चिरकाल टिकावी तसेच समाज परिवर्तनासाठी तरूण नवविचार मांडताना दिसत असल्याचेही राज्यमंत्री तटकरे यांनी सांगितले आणि युवक बिरादरी या संस्थेस राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी शुभेच्छा दिल्या.

अर्थतज्ज्ञ डॉ. मुणगेकर म्हणाले, राष्ट्राला कोणत्याही जाती-धर्म, रंग, वर्ण यानुसार भेदभाव नको तर समानता हवी आहे. आणि ती जगातील सर्वोत्कृष्ट संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशाला लाभली आहे. या स्पर्धेतील विजयापेक्षा तरूणांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असेही डॉ.मुणगेकर यांनी सांगितले.

निवृत्ती न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणाले, मतपेटीतून क्रांती घडत असते. लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांच्या हिताचे काम करणे होय.

औरंगाबाद, पुणे, अमरावती आणि नागपूर अशा चार विभागांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर निवडलेल्या तरूणांना या अभिरूप युवा संसदेत मुंबईतील विधानभवनात सादरीकरणाची संधी प्राप्त झाली.या सुंदर आणि लक्षवेधी उपलब्धीबद्दल जिल्ह्यात सर्वत्र या दोघांचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया:
या सुंदर उपक्रमाच्या माध्यमातुन विधान भवन मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात (Central Hall) आम्ही एक दिवस लोकप्रतिनिधी सारखं बोलु शकलो ही आमच्यासाठी आयुष्यातील एक अविस्मरणीय गोष्ट आहे. अशे उपक्रम खऱ्या अर्थाने संसदीय लोकशाही प्रणालीबद्दल युवकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देणारे आहेत. आमच्यासारख्या युवकांना ही संधी लाभली यासाठी आम्ही युवक बिरादरी भारत संस्थेचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
प्रशांत वाघाये
कमल साठवणे