रविवारी सादर होणार अग्निकांडाचा अहवाल

0
28

भंडारा- जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीच्या मध्यरात्री घडलेल्या जळीतकांडात १0 निष्पाप बाळांना जीव गमवावा लागला. नागपूरच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली या घटनेची चौकशी सुरू आहे. ही समिती रविवारी आपला अहवाल सादर करणार आहे. तथापि, या घटनेबाबत एकही अधिकारी काहीही सांगण्यास तयार नाही.
९ जानेवारीच्या मध्यरात्री जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटमध्ये अचानक आग लागून १0 बाळांचा मृत्यू झाला. तर सात बालकांना वाचविण्यात यश आले होते. बचावलेली बालके आता सुखरुप आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे.
ही समिती दररोज रुग्णालयाची पाहणी, कर्मचारी आणि अधिकार्‍यांचे बयान, घटनेची माहिती जाणून घेत आहे. ज्या कक्षात ही आग लागली त्या कक्षात चौकशी समितीच्या सदस्य, वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांशिवाय कुणालाही जाऊ दिले जात नाही. गेल्या पाच दिवसांपासून चौकशी समिती घटनेमागील सत्यता शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, ही चौकशी आता अंतिम टप्प्यात आली असून येत्या रविवारी आपला अहवाल सादर करणार आहे. परंतु, चौकशीसंदर्भातील कोणतीही माहिती देण्यास अधिकार्‍यांनी नकार दिला आहे.
जिल्हा रुग्णालयातील घटनेनंतर या रुग्णालयातील सुरक्षेसंदर्भातील अनेक गंभीर बाबी पुढे आल्या आहेत. सामान्य रुग्णालयात फायर सेफ्टी हायड्रंट उपलब्ध नाही. फायर सेफ्टी स्पिंकलर प्रणाली नाही. स्मोक अलार्म उपलब्ध नाही. आग लागल्यानंतर वेळीच अलार्म वाजून नागरिक सतर्क झाले असते. दुदैर्वाने हे झाले नाही.
जिल्हाधिकार्‍यांना समन्स
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीसंदर्भातील चौकशीचा अहवाल ४८ तासात सादर करावा, असे निर्देश बाल अधिकार संरक्षण आयोगाने भंडार्‍याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांना दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठविले आहे. १८ जानेवारीला ३.३0 वाजतादरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सला संबंधित कागदपत्रासंह हजर रहावे, असेही म्हटले आहे.