कोविड-19 लसीकरणाचा जिल्ह्यात शुभारंभ
गोंदिया,दि.16 : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 16 जानेवारीला संपूर्ण देशात कोरोनाचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यात 16 जानेवारीला तीन केंद्रावर 300 फ्रंटलाईन वॉरियर्सला लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी आरोग्य यंत्रणा संपूर्ण सज्ज झाली असून जिल्ह्यात लसीकरणासाठी 10 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. सर्वप्रथम आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जात असून जिल्ह्यात 8428 फ्रंटलाईन वॉरियर्सची यादी तयार करण्यात आली आहे.गोंदियात आज लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला,त्यात पहिला मान डॉ.राजेंद्र जैन यांना मिळाला.तर तिरोड्यात डाॅ.हिम्मत मेश्राम यांना पहिला मान मिळाला.
16 जानेवारीला जिल्ह्यातील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया, उपजिल्हा रुग्णालय तिरोडा व ग्रामीण रुग्णालय देवरी येथील लसीकरण केंद्रावर कोविड लसीकरणाचा शुभारंभ करण्यता आला. लसीकरणाची सर्व तयारी आरोग्य विभागाने केली होती. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरिक्षण कक्ष उभारण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर म्हणजे आरोग्य सेवा देणाऱ्यांना लस देण्यात आली. यासाठी लाभार्थ्यांची यादी यापूर्वीच कोविन ॲपवर अपलोड करण्यात आली होती. आज शुभारंभाच्या दिवशी जिल्ह्यातील तीन केंद्रावर प्रत्येकी 100 याप्रमाणे 300 फ्रंटलाईन वारियर्सला लसीकरण करण्याचे उद्दिष्ट होते. लसीकरण झाल्यानंतर 30 मिनिटे त्या रुग्णाला निरिक्षणाखाली ठेवण्यात आले. ज्यांची पोर्टलवर नोंदणी झाली आहे अशांनाच कोरोनाची लस देण्यात आली. सिरम इन्स्टिट्यूट पुणे निर्मित कोविशिल्ड लस घेण्याचा महिला मान डॉ.राजेंद्र जैन यांना मिळाला. सकाळी 10.30 वाजता जगातील सर्वात मोठ्या लसीकरणाचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला.
केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय येथील लसीकरण केंद्रावर जिल्हास्तरीय लसीकरणाचा शुभारंभ सकाळी 10.30 वाजता करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थित डॉ.राजेंद्र जैन यांना कोविशिल्डची पहिली लस देण्यात आली. लसीकरण केंद्रावर केंद्र शासनाच्या सूचनेनुसार सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. लस घेतल्यानंतर डॉक्टरांनी अतिशय सकारात्मक प्रतिक्रीया व्यक्त केल्या. कुठलीही शंका न ठेवता नागरिकांनी येत्या काळात लसीकरण करुन घ्यावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचारी, लसीकरण अधिकारी व पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या लसीकरण केंद्राला आमदार विनोद अग्रवाल व नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी भेट दिली व केंद्राची पाहणी केली.तिरोडा रुग्णालयात आमदार विजय रहागंडाले,नगरपरिषद उपाध्यक्ष सुनिल पालांदुरकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
लसीकरणाच्या अभियानाला यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी निर्देश दिले आहेत. यावेळी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, अतिरिक्त आरोग्य उपसंचालक डॉ.रवि धकाते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.संजय पांचाळ, डॉ.वेदप्रकाश चौरागडे, डॉ.सुवर्णा हुबेकर व डॉ.प्रशांत तुरकर उपस्थित होते.