Home विदर्भ विदर्भ-मराठवाड्यासाठी नवीन ५00 बसेस

विदर्भ-मराठवाड्यासाठी नवीन ५00 बसेस

0

अमरावती दि.२४- : विदर्भ-मराठवाड्यासाठी स्वतंत्र नवीन ५00 बसेस खरेदी करणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. आढावा बैठकीसाठी येथे आले असता त्यांनी शासकीय विश्राम भवनात बुधवारी पत्रपरिषद घेतली. राज्य परिवहन महामंडळ कात टाकत असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.
ते पुढे म्हणाले, एसटी महामंडळात भंगार बसेस असल्याची ओरड बंद केली जाणार आहे. त्यासाठी नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या जातील. नवीन बसेस सर्वप्रथम विदर्भात दिल्या जाणार असून एसटीचालक, वाहकांची समान सेवा निश्‍चित करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. तसेच कर्तव्यावर असताना १0 लाखांचा विमा, बोनस, भत्ता आदी लाभ मिळणार आहेत. नवीन बसेसची बांधणी परराज्यातून केली जाणार आहे.त्यामध्ये शेतमालाची वाहतूक , नवीन तंत्रज्ञानाला प्राधान्य दिले जाणार आहे.अमरावती-नागपूर शिवनेरी ही सेवा लवकरच विदर्भातील प्रवाशांना मिळेल, असेही ते म्हणाले. तसेच विदर्भ-मराठवाड्यात गंभीर दुष्काळ असून शिवसैनिकांच्या दुष्काळी पथकांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना रोहयोतून मदत केली जाणार आहे. यात शेतक र्‍यांना शेततळे, नवीन विहिरी, सिंचन सुविधाउपलब्ध करून दिली जाईल, असे ते म्हणाले.
यावेळी आ. श्रीकांत देशपांडे, दिगंबर मानकर, बाजार समितीचे संचालक नाना नागमोते, महापालिकेतील विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version