
- राष्ट्रीय महिला दिन साजरा
- कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
भंडारा, दि. 8 :- देशाने व राज्याने विविध क्षेत्रात प्रगतीचे नवं नवीन शिखर पादाक्रांत केली असून विविध क्षेत्रातील सर्वांगीण विकासात महिलांचे अतुलनीय योगदान असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने प्रगती केली असून प्रशासनात सुद्धा महिलांच्या प्रगतीचा आलेख अभिमानास्पद असाच आहे असे ते म्हणाले.
महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद भंडारा, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल होत्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानझडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुरसंगे, गट विकास अधिकारी नूतन सावंत, डॉ. माधुरी माथूरकर व गौरव तुरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सती प्रथा बंद करून राजा राम मोहन रॉय यांनी तर महिलांसाठी शिक्षणाची कवाडं उघडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री-पुरुष भेदभाव नष्ट करण्यात मोलाचा वाटा उचलल्याचे श्री. कदम यांनी सांगितले. शिक्षणाचे महत्व विशद करतांना श्री. कदम म्हणाले की, शिक्षणामुळेच समाज प्रगतीपथावर अग्रेसर आहे. सध्याचा समाज हा ज्ञान आधारित समाज असून ज्ञानाच्या क्षेत्रातील महिलांची प्रगतीसुद्धा वाखाणण्याजोगी आहे.
विविध क्षेत्रात काम करत असताना महिला अधिकारी कर्मचाऱ्यांकडून समाजाला मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांवर महिला नेहमीच खऱ्या उतरल्या आहेत. कार्यतत्पर व प्रामाणिक ही महिलांची गुणवैशिष्ट्ये आहेत. आपले कर्तृत्व सिद्ध करतांना आपल्यातील वैशिष्ट्य लुप्त होता काम नये. आपल्यातील वैशिष्ट्य ओळखा ते कायम जपा असा सल्ला मीनल करनवाल यांनी महिलांना दिला.
महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा व त्यांच्या कामाची ओळख समाजाला व्हावी या उद्देशाने आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे मनीषा कुरसंगे यांनी प्रास्ताविकात सांगितले. पोषण आहार, निवडणूक, कृषी, बचतगट अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्री शक्तीचा गौरव व सत्कार या निमित्ताने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उमेदच्या कार्याचा थोडक्यात आढावा सादर केला. यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभिमानाचा’ शुभारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. महिला बचतगट निर्मित वस्तूंचे प्रदर्शन यावेळी भरविण्यात आले. या प्रदर्शनाला जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन बचत गटातील महिलांचे कौतूक केले.
उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गौरव
महिलांचा निवडणूकीमध्ये सहभाग वाढावा तसेच त्यांच्या निवडणूक प्रक्रियेविषयी जागरूकता वाढावी यासाठी माध्यामातून जनजागृती केल्याबद्दल महिला पत्रकार कविता नागापूरे व श्रध्दा पडोळे, लोकसभा व विधानसभा निवडणूक तसेच मतदार नोंदणी व निवडणूक प्रक्रियेमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल मतदार नोंदणी तथा उपविभागीय अधिकारी साकोली मनिषा दांडगे, मतदार नोंदणी व मतदान प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल आशासेविका किरण रमेश सुर्यवंशी, ज्योती महिपाल बैस, वनश्री चंद्रहास चव्हान, धनश्री बांगलकर, मनीषा गजभिये यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
योगिता परसमोडे तुमसर, जसूदा पुराम पवनी, शारदा वाकोडीकर पवनी, भंडारा येथील सुधा कालेश्वर, छाया ढोरे, अर्चना किंमतकर, वर्षा मेंढे, अर्चना ढेंगे आंधळगाव, नलीनी पाथोडे साकोली, कविता डोंगरवार कारधा, संगिता रामटेके कारधा, ममिता लोहकर पवनी, विद्या वाघमारे पवनी, मनीषा गजभिये तुमसर, नलीनी आकरे भंडारा, छाया बुरडे भंडारा, धनश्री नेवारे तुमसर, मंगला गभने तुमसर, हिरकनी खोब्रागडे भंडारा, सिमा ठवकर भंडारा, आशा वाढई भंडारा, स्नेहलता बन्सोड कारधा, सारंगा उके कारधा, चेतना मळकाम भंडारा, रज्जू कुकडे भंडारा, गायत्री गायधने मोहाडी, शुभांगी गभने लाखनी, प्रतिभा राखळे मोहाडी, पदमा जोशी सांगळी यांचा विशेष कार्यासाठी सत्कार करण्यात आला.
· कार्यक्रमस्थळी महिला दिनाचे औचित्य साधून आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिलांनी फेटे बांधले होते. त्यामुळे कार्यक्रम आणखीच आकर्षक झाला. |