कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती द्या- जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

0
28
  • घरोघरी जावून लसीकरणविषयी माहिती द्या
  • प्रत्येक केंद्रावर दैनंदिन १०० व्यक्तींना लसीकरण व्हावे

वाशिम, दि. २5: जिल्ह्यात सध्या शासकीय व खाजगी अशा एकूण ४० केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जात आहे. येत्या एक-दोन दिवसांत जिल्ह्यातील सुमारे ७५ आरोग्य उपकेंद्रावर सुद्धा लसीकरणाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यक्तींना आपल्या गावात किंवा गावाजवळच लस घेता येणार आहे. सर्व तालुकास्तरीय यंत्रणांनी जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी समन्वयाने काम करावे. तसेच तालुकास्तरावर सूक्ष्म नियोजन करून सर्व संबंधित यंत्रणांच्या सहाय्याने घरोघरी जावून लसीकरणाबाबत माहिती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, २४ मार्च रोजी झालेल्या आढावा सभेत ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे, प्रभारी नगरपालिका प्रशासन अधिकारी दीपक मोरे यांच्यासह सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक, तलाठी, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका व शिक्षक यांनी घरोघरी जावून लसीकरणास पात्र व्यक्तींना लसीकरणाचे महत्व पटवून द्यावे. १ एप्रिल पासून ४५ वर्षेपेक्षा अधिक वय असलेल्या सर्वांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. सध्या ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील दीर्घ आजार असलेल्या व्यक्ती आणि ६० वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्यात येत आहे. या व्यक्तींपर्यंत लसीकरणाची माहिती पोहोचविण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात विविध माध्यमातून जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांवर दररोज किमान १०० व्यक्तींचे लसीकरण होईल, यासाठी नियोजन करावे. याकरिता तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करून त्याप्रमाणे अधिनस्त कर्मचाऱ्यांना निर्देश द्यावेत. तसेच त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा नियमित आढावा घ्यावा. कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून या मोहिमेत हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत हयगय करणाऱ्यांवर नाईलाजाने कारवाई करण्याची वेळ येवू नये, असा इशारा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी दिला

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मोहिते म्हणाले, ग्रामस्तरीय समिती व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण भागात लसीकरणाविषयी प्रभावी जनजागृती मोहीम राबवावी. याकरिता सर्व ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी यांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हिंगे म्हणाले, ग्रामस्तरीय समितीचे अध्यक्ष असलेले सरपंच तसेच शहरी भागामध्ये संबंधित प्रभागाचे नगरसेवक यांची मदत घेवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कोरोना लसीकरण मोहिमेची माहिती पोहचवावी.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व मुख्याधिकारी यांच्याकडून लसीकरणासाठी करण्यात येत असलेल्या जनजागृती मोहिमेचा आढावा घेतला. तसेच ही मोहीम अधिक गतिमान करण्याच्या सूचना केल्या.