वन संरक्षण व संवर्धन काळाची गरज : दर्शना पाटील

0
37

अर्जुनी मोरगाव : सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी वृक्षाविषयी आपल्या मनातील भावना व्यक्त करताना वृक्षांना सोयरे म्हणून संबोधले. त्याच राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक माणसांच्या हृदयामध्ये आपले स्थान निश्चित केलेल्या रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी वृक्षलागवड आणि वन संवर्धनाबाबत अत्यंत जागरूकतेने स्वतंत्र आज्ञापत्र काढून वृक्षतोड करणार्‍यावर बंदी घातली होती.

परंतु कालांतराने वनांचे महत्त्व व संवर्धन करण्यात कमी पडलो, यासाठी लोकांमध्ये वृक्ष संवर्धनाच्या बाबतीत जाणीव-जागृती व्हावी म्हणून सर्वप्रथम १९७१ मध्ये २१ मार्च हा जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्याची संकल्पना समोर आली. राष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक भरभराटीत समृध्द वनांचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे वन संवर्धन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वन परिक्षेत्राधिकारी दर्शना पाटील यांनी व्यक्त केले

गोठणगाव येथे संयुक्त वनव्यवस्थापन समिती तसेच वनपरिक्षेत्र कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतापगड, जांभळी, वडेगाव/ बध्या, डोंगरगाव, नवीनटोला, परसटोला या ठिकाणी वन प्रबोधनाचे छोटेखानी कार्यक्रम करून वनदिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला त्या-त्या गावातील वन समितीचे अध्यक्ष, सचिव, क्षेत्र सहाय्यक डी.एम. बुरेले, क्षेत्र सहायक नान्हे, मेश्राम, सहाय्यक पठाण, क्षेत्र सहाय्यक शेंडे, वनपरिक्षेत्र कार्यालयाचे सर्व वनरक्षक, समितीचे सदस्य व गावकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून क्षेत्र सहाय्यक बुरेले यांनी वन संरक्षण व संवर्धन करणे, आगीपासून व वणव्याद्वारे जंगल वाचवले पाहिजे, एलपीजी गॅसबाबत गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

त्या पुढे म्हणाल्या, की राष्ट्राचा एक घटक या नात्याने प्रत्येकाने या राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण केले पाहिजे. वनसंपत्ती ही राष्ट्राची व पर्यायाने प्रत्येकाच्या मालकीची आहे. तिच्या संरक्षणाची जबाबदारी केवळ शासनाची या दृढ दुर्दैवाने रूढ झालेल्या कल्पनेच्या अनिष्ट परिणामांची जाणीव जनतेला करून देणे अत्यंत आवश्यक आहे. निष्कारण वनसंहार हा आपल्या भावी पिढीच्या प्रगतीला मारक आहे, याची प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे, असेही त्या या वेळी म्हणाल्या. याप्रसंगी वन परिक्षेत्रातील गावांमध्ये मोठ्या संख्येने गावकरी विशेषतः महिलाची उपस्थिती लक्षणीय होती.