पवनी- गेल्या तीन वर्षांपासून अत्यंत धिम्या गतीने सुरू असलेल्या कारधा ते निलज या रस्त्याच्या सिमेंटीकरणाच्या सदोष बांधकामामुळे आजवर झालेल्या अपघातात अनेकांचा बळी गेला आहे. परंतु, रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करण्यास बांधकाम कंपनीकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. एकट्या निलज ते सिंदपुरीपर्यंत २0१९ ते २३ मार्च २0२१ पयर्ंत १६ अपघात झाले असून त्यात ९ जणांचा मृत्यू झाला. तर ८ जण जखमी झाले. रस्त्याच्या सदोष बांधकामामुळे हे अपघात होत असले तरी बांधकाम कंपनी याकडे लक्ष देण्यास दुर्लक्ष करीत आहे.
कारधा ते निलज या रस्ता बांधकामासाठी ठिकठिकाणी खोदकाम केले आहे. काही ठिकाणी बांधकाम सुरू आहे तर काही ठिकाणी माती टाकून ठेवली आहे. पवनी पूलापासून ते न.प. महाविद्यालय पवनीपर्यंतचा रोड या ठिकाणी मातीचे भरण टाकून सहा महीने लोटून गेले. परंतु अजूनही काम केले नाही. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. माती टाकून ठेवल्यामुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. स्वत:चे आरोग्य धोक्यात घालून या रोडवरुन जावे लागते. रस्त्याच्या कडेला असलेली घरे आणि दुकानांमध्ये धूळच धूळ असते. धुळीचा त्रास सहन न झाल्याने काही दिवसांपूर्वी नागरिकांना रस्त्यावर येऊन आंदोलन देखील करावे लागले होते. पवनीच्या पुलावर मोठे खड्डे व पुलाच्या दोन्ही बाजूला माती जमा झाल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी ज्या ठिकाणी वारंवार अपघात होत असतील तर त्याला ब्लॅक स्पॉट घोषित करून तेथे बदल करावा, असे सांगितले आहे. परंतु इतके अपघात होऊन व मृत्यू होऊन बांधकाम कंपनी, कंत्राटदार आणि प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. अपघाताच्या तांत्रिक चूका काय, याचे विेषण करण्याची तसदीसुद्धा संबंधित अधिकारी घेत नाही. याकडे लक्ष घालून लवकरात लवकर योग्य ते नियोजन करून नागरिकांचे जाणारे नाहक प्राण वाचवावे व दिरंगाई करणार्यांवर योग्य ती कारवाई करावी, यानंतर अपघातात कुणाचा मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर संबंधित अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी योगेश बावनकर यांनी केली आहे.