‘रोहयो’ कामाची मागणी नोंदविण्यासाठी २ एप्रिल रोजी गावपातळीवर शिबीर

0
50
  • मजुरांनी काम मागणी नोंदविण्याचे आवाहन

वाशिम, दि. २७ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गावातील अकुशल काम करण्यास इच्छुक असलेल्या मजुरांकडून काम मागणी अर्जाची नोंदणी करण्यासाठी गावपातळीवर २ एप्रिल २०२१ रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) शैलेश हिंगे यांनी दिली आहे.

या शिबिराची माहिती देण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ३० व ३१ मार्च रोजी गावात दवंडी देण्यात येणार आहे. गावपातळीवरील या शिबिरामध्ये सर्व ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक हे काम मागणी अर्जाचे नमून घेवून उपस्थित राहणार असून मजुरांनी त्यांच्याकडे विहित नमुन्यात कामाची मागणी नोंदवावी. मजुरांना काम मागणीच्या वेळी आधार क्रमांक लिंक करण्यात आलेल्या बँक पासबुकची छायांकित प्रत अर्जासोबत देणे बंधनकारक आहे. ग्रामसेवक यांच्याकडून काम मागणी अर्जाची पोच सर्व संबंधितांना देण्यात येईल.

ग्रामपंचायत स्तरावरील २ एप्रिल रोजी होणाऱ्या शिबिरामध्ये प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यासाठी पंचायत समिती स्तरावर विशेष कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. अपवादात्मक परिस्थितीत तहसील स्तरावर विशेष कक्षाची व्यवस्था करण्याबाबत सबंधित तहसीलकडून व्यवस्था करण्यात येईल. ग्रामसेवकाकडून काम मागणी अर्जाची पोच मिळाली नसल्यास मजुरांनी पंचायत समिती अथवा तहसील स्तरावरील विशेष कक्षाकडे तक्रार करावी. जिल्ह्यातील जास्तीत जास्त मजुरांनी या शिबिरादिवशी कामाची मागणी नोंदवावी. जेणेकरून योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल व त्यातून गावात मत्ता निर्मिती होण्यास मदत होईल, असे उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्री. यांनी म्हटले आहे.