तिरोडा, दि.27 : तालुक्यात आजही अनेक असे नागरिक आहेत की त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाही. कधी अनेक गावांतील राजकारणामुळे तर कधी प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या दुर्लक्षित धोरणांमुळे तर कधी पैशाच्या मागणीमुळे असे प्रकरण रखडलेले असतात. त्यामुळे गरीब-गरजू लोकांना लाभापासून वंचित राहण्याची पाळी येते. असाच एक प्रकरण तालुक्यातील गोंडमोहाळी गावात घडला. गावातील दोन पक्षांच्या राजकारणाचा बळी ठरल्यामुळे एका ज्येष्ठ नागरिकाला शासनाच्या योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची पाळी आली.
तिरोडा पंचायत समिती अतंर्गत येणार्या ग्राम गोंडमोहाळी येथील जेष्ठ नागरिक प्रल्हाद मोरबा ढोमणे (वय 69) यांचे संपूर्ण घर जीर्ण झाले आहे. ते कधीही धराशाही होऊ शकते व त्या कुटुंबावर बेघर होण्याची पाळी उद्भवू शकते. अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाही संबंधित ग्रामपंचायतीने त्या गरीब व ज्येष्ठ नागरिकाला घरकूल योजनेचा लाभ मिळवून देण्याची मानसिकता दाखविली नाही. शौचालायचा लाभ सुद्धा त्यांना देण्यात आला नाही. अशी व्यथा प्रल्हाद ढोमने यांनी सदर प्रतिनिधीकडे मांडली.
यावर सदर प्रतिनिधीने गावातील लोकप्रतिनिधींना हा प्रकार कळविला. त्यानंतर त्या मोडक्या-पडक्या घराची पाहणी करण्यात आली. या वेळी सरपंच दुर्गा शरणागत, उपसंरपच भाष्कर येळे, भुमेश्वर शेन्डे, किसान आघाडीचे महामंत्री तथा संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष चतुर्भुज बिसेन, मनोहर बुध्दे, हुपराज जमईवार व इतर नागरिक उपस्थित होते. घराची पाहणी करून व अतीगरजू लाभार्थी म्हणून संरपच यांनी ठराव घेऊन पचांयत समितीला पाठविले व घरकुलाचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
जवळच्या श्रीमंत कुटुंबातील नागरिकांना लाभ देण्यात आला. मात्र, हा गरजू-गरीब कुटुंब वंचित राहिला. या कुटुंबाला घरकूल योजनेचा लाभ त्वरित देण्यात यावा, अशी घरकुल देण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी सुद्धा केली आहे. सदर लाभार्थी मोडीत असलेल्या घरात पत्नी, मुलगा, सून, नांतवड अशा एकूण 8 सदस्यांसोबत राहत आहे. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत असून गावातील दोन पक्षाच्या राजकारणाचा बळी हा गरीब कुटुंब ठरला आहे.