इर्री ग्रामपंचायत येथील प्रकार.
ग्रामपंचायत प्रशासनावर कारवाईची मागणी.
गोंदिया,ता.27 – वीस वर्षांपूर्वी येथील एका शेतकऱ्यने आपल्या खाजगी शेतात राहण्यासाठी झोपडी बांधलेली होती. सदर बांधलेली झोपडी ही ग्राम पंचायतच्या हद्दीत येत असुन ती अतिक्रमणात येत असल्याचा ठपका ठेवीत त्यावर शुक्रवारी तारीख 27 बुलडोजर चालून जमीनदोस्त केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया तालुक्यातील इर्री ग्रामपंचायत मध्ये उघडकीस आला आहे. सदर कारवाई अगदी होळीच्या सणाच्या पूर्वी झाल्यामुळें सदर गरीब शेतकऱ्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे.
येथील शेतकरी ओमकार नंदलाल दमाहे यांनी आपले वडिलोपार्जित शेत गट क्रमांक 1346 मधील शेतात आपल्या कुटुंबासहित राहण्यासाठी झोपडी बांधली होती. या झोपडीत ते आपल्या कुटुंबासहित निवास करीत होते. सदर शेतातील झोपडी ही ग्रामपंचायतच्या जागेवर आहे असा ठपका ठेवीत ग्रामपंचायत प्रशासनाने ती शुक्रवारी बुलडोजर लावून जमीनदोस्त केली आहे. यात सदर शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून जीवनापयोगी साहित्य नष्ट झाले आहे. त्यामुळे सदर शेतकरी कुटुंब उघड्यावर आले आहे.
इर्री गावातील जवळपास शंभराच्या वर नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वेगवेगळ्या जागेवर अतिक्रमण केलेले आहे. एवढेच नव्हे तर येथील एक खाजगी शाळा देखिल अतिक्रमणाच्या जागेवर बांधण्यात आली आहे. असे असतानाही येथील सरपंच सचिव यांनी आकसापोटी व मनमानी कारभार करीत खाजगी जागेवरील केवळ एकच झोपडी जमीनदोस्त केली आहे.व गावातील इतर कोणत्याही व्यक्तीचे अतिक्रमण पाडले नाही असा आरोप या शेतकऱ्यांनी लावला आहे. एवढेच नव्हे तर यासाठी सर्व शासकीय नियम धाब्यावर बसविण्यात आले असून ग्रामसभेत याचा कोणताही ठराव घेण्यात आलेला नाही.अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.यासंबंधात येथील सरपंच सचिव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे भ्रमणध्वनी नॉटरिचेबल दिसून आले.गावात अनेक नागरिकांचे अतिक्रमण आहे, त्यामुळे कारवाई ही सर्व अतिक्रमण धारकांवर करणे अपेक्षित होते परंतु तसे न करता केवळ एका खाजगी जागेवरील झोपडी जमीनदोस्त करण्यात आली. या प्रकाराला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परवानगी दिलीच कशी? यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे साटेलोटे तर नाही ना ? असा प्रश्न उपस्थित करून सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून येथील सरपंच सचिव खंडविकास अधिकारी व तहसीलदार यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सदर आपद्ग्रस्त शेतकरी ओमकार नंदलाल दमाहे यांनी दिला आहे.
सदर प्रकार अत्यंत खेदजनक असुन हे केवळ सरपंच यांच्या मनमानी कारभाराची देण आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा दबाव आणला होता. यासाठी केवळ सरपंच सचिव जबाबदार असून या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी होणे गरजेचे आहे. रवी तरोने , उपसरपंच ग्रामपंचायत इर्री