शिक्षिका मीरा माणिक गेडाम यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ

0
55

गोंदिया- स्थानीक रामनगर येथील नुतन विद्यालय येथे कोविड -19 च्या सर्व नियमांचे पालन करून मीरा माणिक गेडाम (सहायक शिक्षिका) यांचा सेवानिवृत्तिपर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अमृत इंगळे (सचिव,श्री राष्ट्रीय शिक्षण संस्था), प्रमुख पाहुणे म्हणून वाय.पी. बोरकर (मुख्याध्यापक- नुतन विद्यालय), व्ही.जे. रावते (मुख्याध्यापक- श्रीराम विद्यालय खमारी), जी.आर.कापगते (पर्यवेक्षक- नुतन विद्यालय) व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे हस्ते सत्कारमुर्तीना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक वाय.पी. बोरकर यानी कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती मीरा माणिक गेडाम यांचा जीवन परिचय करून दिला व मनोगत व्यक्त करताना सत्कारमुर्ती गेडाम मॅडम च्या शिस्तबद्ध कामकाजशैली, मितभाषी, कामासाठी सदैव तत्पर असण्याबाबतचे अनुभव सांगितले. सचिव अमृत इंगळे यानी अध्यक्षीय संबोधनातुन “शासकीय शिक्षण सेवेतुन जरी आपण निवृत्त होत आहात पण भावी जीवनात सामाजिक बांधिलकी कायम ठेऊन आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा इतराना देत राहा” अशी कामना व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती शिक्षिका सौ.मीरा गेडाम व त्यांचे सहचारी माणिक गेडाम यांचे शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन उपस्थित सर्व पाहुण्यांच्या हस्ते नुतन विद्यालय प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कारमुर्तीं यांचे सहचारी वरीष्ठ साहित्यिक पत्रकार माणिक गेडाम यानी सेवानिवृत्त होत असलेल्या सहचारिणी करिता आयोजित केलेल्या निरोप समारंभासाठी शाळा प्रशासनाचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी श्रीराम विद्यालयाच्या वतीनेही सौ.मीरा गेडाम मॅडम व श्री माणिक गेडाम यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सत्कारमुर्ती मीरा गेडाम यानी गहिवरून आपल्या 36 वर्षाच्या प्रदिर्घ कार्यकाळा दरम्यान सर्वांचे सहकार्य लाभल्यास्तव भावपूर्ण शब्दात सर्वांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एम.राऊत सर यानी केले तर सहायक शिक्षक आर.जी.कटरे यानी उपस्थित सर्व पाहुण्यांचे आभार मानले. शिक्षणाची जिद्द कायम ठेवीत इतरांनाही पुढे यशस्वी वाटचाल करण्यास प्रेरित करणाऱ्या सौ. मीरा गेडाम मॅडम यांना निरोगी जीवनाच्या शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला.