कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणांनी समन्वय ठेवावे

0
33

गोंदिया- मागील काही दिवसात गोंदिया जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी सज्ज राहून एकमेकांशी समन्वय ठेवून काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
१ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेताना आयोजित सभेत बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्‍व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सदर बैठकीत कोरोना संबंधाने निर्गमीत झालेले आदेश, परिपत्रक, सूचना इत्यादींची कडक अंमलबजावणी करुन दंडात्मक कार्यवाही करण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.
गोंदिया जिल्ह्याच्या लगतच्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग व बाधित रुग्ण यांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे जिल्ह्यात अँन्टीजेन तपासणी वाढविण्याचे निर्देश देवून तालुका स्तरावर संपूर्ण आरोग्य यंत्रणेला पूर्ण कार्यक्षमतेने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
उपविभागीय अधिकारी यांना कोरोनाबाबत रुग्ण ज्या क्षेत्रामध्ये आढळून आल्यास त्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करणे, बाधित रुग्णांच्या उपचारासाठी सी.सी.सी. (कोरोना केअर सेंटर) कार्यान्वीत करुन तेथे रुग्णांना दाखल करणे, बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची संपर्क तपासणी करणे, कंटेन्मेंट झोन व हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये प्रत्येक तीन दिवसात सर्वे करणे, सर्वेमध्ये ताप, सर्दी, खोकला, ऑक्सीजन लेव्हलची तपासणी करणे, आय.एल.आय. सारी इत्यादी प्रकारच्या रुग्णांचा शोध घेणे, फिवर क्लिनिक अँक्टीव्ह करणे, गृह अलगीकरणात असलेल्या नागरिकांच्या हातावर शिक्का लावणे इत्यादी संदर्भात सूचना देण्यात आल्या.
जिल्हा सूचना व विज्ञान विभागामार्फत जिल्ह्याच्या सांकेतिक स्थळावरुन सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरोनाच्या उपचारासाठी डी.सी.एच.सी. व डी.सी.एच. या ठिकाणी रिकामे असलेल्या खाटांची संख्या, कंटेन्मेंट झोन, लसीकरण इत्यादी बाबतची माहिती अद्ययावत करुन सदर सेवेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना व्हावा असे निर्देश दिले.
सभेला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी पंकज गजभिये, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सतीश माकर्ंड, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, नगरपरिषद/नगरपंचायत मुख्याधिकारी उपस्थित होते.