
संतोष रोकडे/अर्जुनी-मोर,दि.02ः-कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असूनही अगदी प्रतिकूल परिस्थितीत मागील वर्षीच्या तुलनेत महसूल वसुलीचे लक्षांक पुर्ण करीत अर्जुनी मोरगाव तहसिल कार्यालयाने जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे.लॉकडाऊन काळात आर्थिक वर्षाचे जवळपास आठ ते नऊ महिने गेले असले तरी अर्जुनी मोरगाव तालुक्याने आपले महसूल वसुलीचे उद्दिष्ट शंभर टक्के पेक्षा जास्त साध्य करून या महामारीच्या कठीण प्रसंगात शासनाच्या तिजोरीला हातभार लावला आहे. विशेष म्हणजे गौण खनिज विषयक पत्र ब चे उद्दिष्ट दोन कोटी पेक्षा जास्त असताना आणि तालुक्यातील एकही वाळू घाट लिलावासाठी प्रस्तावित नसतानाही अवैध गौण खनिजाचे उत्खनन आणि वाहतूक प्रकरणात दंडात्मक कारवाई करून ते सुद्धा उद्दिष्ट पूर्ण केले आहे.अर्जुनी-मोर उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, अर्जुनी-मोरचे तहसीलदार विनोद मेश्राम यांच्या यशस्वी मार्गदर्शनाच्या आधारे नायब तहसीलदार,क्षेत्रिय अधिकारी,कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांचे सहकार्य मिळाले अशी प्रतिक्रिया तहसीलदार विनोद मेश्राम यांनी दिली.