
- शिवस्वराज्यदिन साजरा
- जिल्हा परिषद प्रांगणात अस्मितादर्शक सोहळा
- ग्रामपंचायतीमध्येही उत्साहात आयोजन
भंडारा, दि.6:- जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पारंपारीक शिवकालीन तुतारीच्या निनादात, उत्साही, भारावलेल्या, मंगलमय वातावरणात, शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत ‘शिवस्वराज्यदिन’ साजरा करण्यात आला. यावेळी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून युगप्रवर्तक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मुजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे लोककल्याणकारी कार्य शासन व प्रशासनासाठी आजही प्रेरणादायी असल्याचे मत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी व्यक्त केले.
6 जून 1674 या मंगलमय दिनी शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक झाला आणि राजे ‘छत्रपती’ झाले. आजच्याच शुभ दिनी शिवाजी महाराजांनी आपल्या सार्वभौमत्वाचा मंगल कलश जनतेला अर्पण करून समृद्धीचे दिवस आणले. आजपासून दरवर्षी 6 जून हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
आज भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज सकाळी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी गुढी उभारुन शिवस्वराज दिन साजरा केला. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे व जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते तर ते खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते होते. त्यांनी 350 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या लोककल्याणकारी राज्याचे उदाहरण आजही आदर्श आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री. कदम यांनी यावेळी केले.
शिवरायांनी कृषी विकास, जलसिंचन, पर्यावरण संवर्धन, लोककल्याणकारी प्रशासन, उद्यमशीलता अशा विविध बाबतीत विकासाचा परिपूर्ण दृष्टिकोन निर्माण केला. महाराजांनी जलसंवर्धन, वनसंवर्धन, ग्रामस्वच्छता, लोकाभिमुख प्रशासन अशा विविध दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने एक आधुनिक राज्य स्थापन केले. या मंगलमय दिनानिमित्त त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
आज पहिलाच शिवस्वराज्य दिन जिल्हाभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भंडारा जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रगीत महाराष्ट्राचे मंगलगाण गाऊन हा दिवस सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला.
00000