अनाथ बालकाचा “नाथ” हरवला : गोंदियाच्या जिल्हाधिकार्‍यांनी दिली सांत्वना भेट

0
70

अर्जुनी-मोरगाव, दि.9 : ज्यांनी या जगात आणले, त्यांनीच वाडीत टाकले. अनाथालयात असताना बोलताही येत नव्हते, तेव्हा “नाथ” मिळाला. त्याने स्वीकारले. घरपण दिले. अनाथ बाळकच्या भविष्याचे स्वप्न रंगवले. सारे काही सुरळीत असतानाच कोरोनाचा शिरकाव झाला अन त्या चिमुकल्याचे पितृछत्र हरपले. गोंदियाचे जिल्हाधिकारी सुद्धा तेवढेच भावूक. त्यांनीही साडी-चोळी, चिमुकल्याला कपडे व फळफळावळ देत त्या माऊलीला जगण्याचे बळ दिले.

अर्जुनी-मोरगावच्या सिव्हिल लाईन परिसरात सुनील येवले व कुटुंबीय गुण्यागोविंदाने नांदत होते. चार वर्षांपूर्वी त्यांनी नागपूरच्या अनाथालयातून एक गोडस बाळ स्वीकारले. ज्या बाळाला जगात कुणीही नाही, जन्मदात्यांनीच वाळीत टाकले, अशा निरागस बाळाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. पण हे हास्य क्षणभंगुर ठरले. सुनीलवर मे महिन्यात काळाने झडप घातली. कोरोनाच्या महामारीत त्याचे अकाली निधन झाले. त्याचे निरागस बाळासोबत रंगविलेले स्वप्न अपूर्णच राहिले. त्याच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी ती माऊली आहे खरी, पण कपाळावरचा कुंकू पुसला गेल्याने तिचे अवसानच गळाले.
काय करावे सुचेना. मात्र प्रशासनातील एक अधिकारी एवढा संवेदनशील असू शकतो याचा प्रत्यय त्यावेळी आला, जेव्हा गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्याचे वाहन येवले यांच्या घरासमोर येऊन थबकले. यादरम्यान घरासमोरून कितीतरी पाऊलं, वाहनं गेली असतील, पण ती थबकली नाहीत. आल्या-आल्याच त्यांनी अगदी सामान्य माणसाप्रमाणे विचारपूस केली. अन्नधान्य विचारलं. चिमुकल्याच्या शिक्षणाचं विचारलं. रोजगाराची काय सोय आहे, तेही विचारलं. यापैकी काय हवय का? अशी त्यांची आस्थेने विचारपूस केली.
बहिणीला भावाकडून एक भेट म्हणून साडी-चोळी, चिमुकल्याला कपडे व फळफळावळ आणले. आणि त्याचा स्वीकार कर असं अत्यंत भावूक होत बोलले. तिच्या डोळ्यात दुखाश्रू-आनंदाश्रू तरळले. तिनं सुद्धा जिल्हाधिकारी भावाकडून भेटवस्तू स्वीकारल्या. त्या जिल्हाधिकाऱ्याचं नाव आहे राजेश खवले. त्यांनी तिला धीर दिला व जाताना मला माझ्या भावाने पाठवले आहे. माझे हे काम आहे, त्यात सहकार्य करा, असे सांगत तहसीलदारांकडे जाण्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत.

प्रशासनाची सहृदयता

कोरोनात कुणी पती-पत्नी, आई -वडील, मुले गमावली. त्यांच्याप्रती सहानुभूती बाळगणं हे सहृदयतेचं लक्षण आहे. नेमकी ही सहृदयता अर्जुनी-मोरगाव तालुक्यात बघावयास मिळत आहे. येथील तहसीलदार विनोद मेश्राम हे स्वतः कोरोनात जीव गमावलेल्यांना साडी-चोळी, पात्र लाभार्थ्यांना कुटुंब अर्थ सहाय्यत्ता, मोफत अन्नधान्याचे रेशनकार्ड, निराधार योजनेचे लाभ मिळण्यासाठी त्यांच्या घरी भेटी देत आहेत. त्यांनी नुकतीच राजोली-भरनोली, मोरगाव, निमगाव, खामखुरा येथे भेट दिली. प्रशासनाची ही सहृदयता व संवेदना बघून सामान्यांनाही आपले कुणीतरी आहे, याचा प्रत्यय येत आहे.