कोरोनामुळे मृत शेतकऱ्यांच्या कुटूंबाला सुधारित बियाण्याचा अनुदानावर पुरवठा करावा : जिल्हाधिकारी खवले

0
23

गोंदिया दि.10 : कृषि विभागाच्या विविध योजनांची आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली   9 जून रोजी घेण्यात आली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषि विद्यापिठाने संशोधित केलेल्या वाणांचे सुधारित बियाणे वितरीत करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक असलेले परमीट तालुका कृषि अधिकारी यांच्याकडून शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत. जिल्ह्यात मागील काही महिन्यामध्ये कोरोना संसर्गामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्या शेतकरी कुटूंबियांना शासन अनुदानित बियाणे प्राधान्याने देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी बैठकीत दिल्या.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गणेश घोरपडे यांनी धानाचे को-51, एमटीयू-1010, पिकेव्ही तिलक, पिकेव्ही किसान, आयआर-64 इत्यादी सुधारित वाणांचे बियाणे जिल्ह्यात महाबीजच्या वितरकांमार्फत शेतकऱ्यांना अनुदानित दरात उपलब्ध करुन देण्यात येत असून त्यातून कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना लाभ देण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी बियाणे परमीट बाबत तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.