
अर्जुनी-मोरगाव, दि.11 : कोरोना महामारीच्या काळात जिल्हा तथा ग्रामीण भाग भरडला जात असताना या काळातही आपल्या हातून जनतेची सेवा व्हावी म्हणून येथील कर्तव्यदक्ष तहसीलदार विनोद मेश्राम धडपडत होते. गेल्या दीड वर्षापासून संकट चालू असताना त्यांनी 24 तास आपली सेवा सुरू ठेवली. त्यांच्या सेवेचे व उत्कृष्ट कार्य प्रणालीमुळे गोंदियाचे जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी तहसीलदार विनोद मेश्राम यांच्या कार्याची पावती म्हणून एका पत्रान्वये त्यांचे अभिनंदन केले आहे.
तहसीलदार मेश्राम यांनी अर्जुनी-मोरगाव तालुक्यात गृहभेट आपुलकीची या नाविन्यपूर्ण उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी केली. सामाजिक सहाय्यता योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या गोरगरीब, वृद्ध, दिव्यांग व्यक्तींना घरपोच लाभ देण्याकरिता जिल्ह्यामध्ये गृहभेट आपुलकीची हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये तहसीलदार विनोद मेश्राम यांनी हिरीरीने सहभाग घेत तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन निराधार योजनेतील लाभार्थी शोधून काढले. यामध्ये त्यांनी 1288 इतके नवीन लाभार्थ्यांचे स्वतः अर्ज भरून त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला.
आपले हे काम अतिशय महत्वपूर्ण आहे. तसेच गोरगरिबांना न्याय देणारे आहे. आपल्या या कार्याची मी मनापासून प्रसंशा करतो. भविष्यात देखील आपण असेच जनहिताचे काम करीत राहावे, अशा आशयाचे स्तुतीपत्र जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी तहसीलदार विनोद मेश्राम यांना पाठवून त्यांच्या उत्कृष्ट कार्याची प्रशंसा केली.
कोरोनामुळे मृत्त पावलेल्या कुटुंबीयांना भरघोस मदत
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयाच्या वारसांना आर्थिक बळ प्राप्त व्हावे म्हणून तहसीलदार विनोद मेश्राम यांनी जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या मार्गदर्शन पत्रानुसार तालुक्यातील कोरोनामुळे मृत पावलेल्या कुटुंबीयांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांना सर्वतोपरी मदत केली. यामध्ये तालुक्यातील राजोली येथील अमर चिंधु सांगोळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. प्रत्यक्ष त्यांच्या घरी गेल्यावर हे कुटुंब अत्यंत अडचणीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे मृतकाच्या कुटुंबीयांचे मनोबल वाढविण्यासाठी तहसीलदार मेश्राम यांच्याकडून अल्पशी भेट म्हणून काही साहित्य पुरविण्यात आले.
यामध्ये प्रतिमहा 35 किलो धान्य नियमित मिळावे म्हणून अंत्योदय योजनेचे रेसन कार्ड त्वरित बनवून देण्यात आले. सोबत 50 किलो तांदूळ, निराशा अमर सांगळे यांना साडीचोळी, मृतकाची आई सुबत सांगळे यांना पातळ, दोन्ही मुलींना कपडे, फळांचा बॉक्स व विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजनेचे त्वरित अर्ज भरून प्रतिमहा 1000 रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. तसेच विधवा योजनेअंतर्गत बाराशे रुपये प्रतिमहा योजनेचे अर्जही भरून मंजूर करण्यात आले.
त्याचप्रमाणे कोरोणामुळे मृत्यू पावलेले गोवर्धन शिवलाल ताराम रा. राजोली यांच्याही निराधार झालेल्या कुटुंबीयांना सारखीच मदत देण्यात आली. अर्थसहाय्य मिळवून देणारे अर्ज सुद्धा भरण्यात आले. त्याप्रमाणे मोरगाव येथील प्रमोद गोविंदा नाकाडे यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबीयांना लाभ देण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी राजेश खवले प्रत्यक्ष हजर होते हे विशेष. त्याचप्रमाणे कोरोनामुळे मृत्यू पावलेले अर्जुनी-मोर येथील सुनील येवले यांच्याही कुटुंबीयांना जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या उपस्थित सर्व लाभ देण्यात आला. तसेच खामखुरा येथील मृतक अरविंद गोपीनाथ उईके यांच्याही निराधार झालेल्या कुटुंबीयांना मदत पोचविण्यात आली, तर मृतक देवेंद्र मारुती भोयर रा. निमगाव यांच्याही निराधार कुटुंबीयांना मदत पोहोचविण्यात आली.
हा अभिनव उपक्रम गोंदियाचे जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या मार्गदर्शनात अर्जुनी-मोरगावचे तहसीलदार विनोद मेश्राम यांनी यशस्वीरित्या राबविला. या वेळी नायब तहसीलदार के.एन. वाढई, तलाठी प्रवीण ताकसांडे, तलाठी लालेश्वर टेंभरे, तलाठी पुंडलिक कुंभरे, तलाठी प्रकाश कापगते व प्रत्येक गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. तहसीलदार मेश्राम हे अर्जुनी-मोरगाव तालुक्यात राबवित असलेल्या अभिनव उपक्रमाची सर्वत्र प्रसंशा केली जात आहे.