वीज पडून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचे खासदारांकडून सांत्वन

0
53

भंडारा,-शेतात काम करीत असताना वीज पडून मृत्यू झालेल्या मोहाडी तालुक्यातील खमारी येथील व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घेत खासदार सुनील भिडे यांनी त्यांचे सांत्वन केले. मृतकाच्या कुटुंबीयांना मिळणारी मदत कुठल्याही अडचणी शिवाय आणि लवकरात लवकर मिळावी यासाठी ताबडतोब कारवाई व्हावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशही दिले. दोन दिवसांपूर्वी मोहाडी तालुक्यातील खमारी बुद्रुक अशोक उरफडे, आशा दमाहे आणि अर्चना सव्वालाखे काम करीत असताना वीज पडून मृत्यू झाला होता. या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी खासदार सुनील मेंढे यांनी तीनही कुटुंबाची भेट घेतली. त्यांच्यासोबत माजी आमदार चरण वाघमारे, जगदीश उईके, हिरालाल रोटके, सरपंच दमाहे उपस्थित होते. नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून मिळणारी मदत ताबडतोब मिळावी. यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया लवकर पूर्ण केली जावी अशा सूचना यावेळी खासदारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधून केल्या.
गावपातळीवर असलेल्या गोष्टी तात्काळ पूर्ण करून मदत कशी मिळेल या दृष्टीने प्रयत्न करा अशा सूचनाही खासदारांनी तहसीलदार आणि ग्रामसेवकांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपये मिळवून देण्याच्या दृष्टीने ही प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तातडीची आर्थिक मदत म्हणून खासदारांनी काही निधी तीनही कुटुंबीयांच्या सुपूर्द केला. भेटीनंतर ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेऊन गावाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कामांचा आढावा घेतला. नदी काठावर असलेल्या या गावात नदीच्या किनाऱ्यावर पर्यटनाचा विकास करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जावे त्यासाठी निधी आपण उपलब्ध करून देऊ. पंचायतीने यासाठी निधीची तरतूद करावी असे खासदारांनी सांगितले. ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून त्या माध्यमातून गावातील लोकांना जास्त रोजगार द्यावा अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या. या बैठकीला नायब तहसीलदार हुकरे उपस्थित होते.