
वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत देणार मेडिकल सुविधा
जिल्हाधिकारी खवले यांचेकडून विशेष आभार……
गोंदिया 29: गोरेगाव तालुका येथील आई-वडिलांवर काळाने घाला घातलेल्या दोन चिमुकल्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन इंडियन मेडिकल असोसिएशनने मदतीचा हात पुढे केलेला आहे. आता या दोन्ही चिमुकल्यांच्या आरोग्याची काळजी वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत आय.एम. ए. घेणार असून जिल्हाधिकारी राजेश खावले यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशन, गोंदिया तर्फे संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास जैन व कोषाध्यक्ष डॉ. पियुष जयस्वाल यांनी त्या दोन अनाथ झालेल्या चिमुकल्यांना मोफत मेडिकल सेवा देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन त्या दोन मुलींच्या आरोग्यासंदर्भात चर्चा केली. तसेच आवश्यकतेनुसार वेळोवेळी मेडिकल सेवा पुरविण्याचे सांगितले.
सदर कुटुंबियांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी आवाहन केले होते. सदर कुटुंबीयांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटन/संस्था/ लोकप्रतिनिधी/ कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र 18 वर्षापर्यंत या मुलींच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता इंडियन मेडिकल असोसिएशन, गोंदियाने पुढाकार घेतला आहे.
गोरेगांव तालुक्यातील त्या दोन मुलींना आई- बाबांपासून पोरके व्हावे लागले. या मुलींना आपले आई-वडील आता हयात नाहीत याची देखील जाणीव नाही. लहान मुलींना खेळण्या-बागडण्याच्या या वयामध्ये त्यांच्यावर नियतीने घाला घातलेला आहे. या दोन्ही मुलींचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या ८० वर्षाच्या वयोवृद्ध आजीवर आलेली आहे.
परंतु समाजातील सबळ घटकाद्वारे या कुटुंबाला मदतीचा हात घेऊन त्यांची काळजी घेण्याकरिता व त्यांच्या आरोग्य सांभाळण्या करिता इंडियन मेडिकल असोसिएशन,गोंदिया द्वारा मेडिकल सेवा देण्याच्या पुढाकाराकरिता जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी त्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहे.