
भंडारा- कोरोणा महामारी च्या भीषण संकटाच्या वेळी स्वतःचे जीव धोक्यात घालून कोरोना पाॅझिटिव रूग्णांची सेवा करणाऱ्या सर्व कंत्राटी आरोग्य सेविकाना पुनर्नियुक्ती आदेश देण्यात यावे या व इतर मागण्यांसाठीचे निवेदन खासदार प्रफुल्लभाई पटेल यांना युनियनचे अध्यक्ष व आयटकचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके व संयुक्त लोकशाही आघाडीचे अचल मेश्राम यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आले.
18 जुलै 2021 रोजी सायंकाळी सहा वाजता विश्राम भवन भंडारा येथे कंत्राटी नर्सेस व आरोग्य कर्मचारी युनियन ( आयटक) च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून सामूहिक निवेदन देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम खासदार प्रफुल्लभाई पटेल यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. तद्नंतर कॉ.हिवराज उके, अचल मेश्राम, मनीषा तीतिरमारे,ऋतुजा साठवणे इत्यादींनी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती द्यावी म्हणून निवेदन दिले.
खासदार प्रफुल्लभाई पटेल यांनी निवेदन स्वीकारून म्हणाले की, हा संपूर्ण राज्याचा प्रश्न आहे. तुम्ही कोरोना महामारी च्या संकटाच्या काळात सेवा दिलेली आहे. मी तुमच्यासोबत आहे आणि लगेच अर्थमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना तुमच्यासाठी विनंती करतो. कारण कोरोना संकट अजून संपलेला नाही असे ही खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. या प्रसंगी सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील भाऊ फुंडे, माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार चंद्रिकापुरे प्रामुख्याने उपस्थित होते. तर मोठ्या संख्येत कंत्राटी नर्सेस हजर होत्या.