Home विदर्भ 25 ते 31 ऑगस्टपर्यंत शीघ्र डेंग्यू शोध व जनजागृती मोहिम

25 ते 31 ऑगस्टपर्यंत शीघ्र डेंग्यू शोध व जनजागृती मोहिम

0

• जनतेनी सहकार्य करण्याचे आवाहन

गोंदिया,दि.26 : गोंदिया शहरात डेंग्यू, हिवताप रुग्ण संख्येमध्ये होणारी वाढ लक्षात घेता, शहरात जिल्हा हिवताप कार्यालयाकडून जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली 25 ते 31 ऑगस्ट 2021 या कालावधीत संपूर्ण गोंदिया शहरातील प्रत्येक वार्डामध्ये शीघ्र डेंग्यू प्रतिसाद शोध मोहिम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेमध्ये आशा कार्यकर्ती घरोघरी जाऊन ताप सर्व्हे, कंटेनर सर्व्हे व लोकांमध्ये किटकजन्य व जलजन्य आजाराविषयी जनजागृतीचे काम करीत आहेत. कोणताही ताप हिवताप असू शकतो. ‘लवकर निदान-तात्काळ उपचार’
या उक्तीप्रमाणे ताप आलेल्या रुग्णांचे हिवतापाकरीता रक्त नमूने घेऊन तात्काळ निदान आरडीके किटद्वारे केले जात आहे.

याप्रसंगी डॉ.चौरागडे यांनी सांगितले की, हिवताप, डेंग्यू आजारांपासून बचाव करण्याकरीता आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळावा,म्हणजे घरातील पाण्याची सर्व भांडी घासून पुसून कोरडे करुन ठेवायचे.ड्रम, कुलर, पाण्याच्या टाक्या, रांजन, माठ, फुलदान्यातील साचलेले पाणी,रिकामे पडलेले टायर, नारळाच्या करवंट्या यासारख्या टाकाऊ वस्तूमध्ये पाणी साचू दयायचे नाही, जेणेकरुन डासांची उत्पत्ती होणार नाही. तसेच झोपतांना नियमीत मच्छरदानीचा वापर करावा, शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळी बांधावी, ताप आल्यास जवळच्या दावाखान्यात जाऊन तात्काळ रक्त तपासणी करुन उपचार घ्यावा. कोणताही ताप अंगावर काढू नये. घराबाहेर साचलेल्या पाण्यामध्ये
गाडीचे जळालेले इंजीन ऑईल टाकण्याबाबत माहिती दिली. तसेच जनतेच्या सहभागानेच किटकजन्य आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य असल्याचे डॉ.चौरागडे म्हणाले. याकरीता आरोग्य विभागाकडून सुरु असलेल्या डेंग्यू शीघ्र शोध
मोहिमेला जनतेनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Exit mobile version